जीवनात आनंद मिळेल असे काम करा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ

जीवनात आनंद मिळेल असे काम करा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ

जीवनात आनंद मिळेल असे काम करा  - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ

लातूर - जिवनभर जे काम करायचे आहे. त्यात आनंद नसेल तर असे काम पुढे नेणे खूप कठीण होते. त्यामुळे ज्या कामात तुम्हाला आनंद मिळेल अशा कामाची निवड करुन ते करावे, असे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.

येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एम.बी.बी.एस. स्पंदन 2016’ या बॅचचा पदवी प्रदान सोहळा मंगळवार, दि. 26 एप्रिल रोजी पडिले लॉन्स येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड हे होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा शल्यचिकित्सक डॉ. ज्ञानेश्वर चिंते, बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक आरदवाड, प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. हनुमंत किनिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मी बारावी सायन्स पीसीएमबी ग्रुप मधुन चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालो. यानंतर आयआयटी मधुन इंजिनियरिंगची पदवी मिळवली. पुढे एमएस साठी परदेशात प्रवेश मिळत होता. मात्र त्याचवेळी आयआयएम अहमदाबाद येथे एमबीए साठी प्रवेश मिळाला. एमबीए नंतर तीन वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. दरम्यान शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करावा असे वाटले म्हणून युपीएससीची तयारी केली आणि आयएएससाठी निवड झाली, असे सांगून यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, एमबीबीएस नंतर काही जनांचे एमडी, एमएस करण्याचे ठरले असेल तर काही जनांना आपल्या वडिलांचे हॉस्पीटल पुढे चालवायचे असेल तर काही जन पुढे काय करायचे म्हणून गोंधळलेले असतील.

मात्र जीवनात सर्वच गोष्ठी ठरवून करता येत नाहीत. जीवन हे खुप गतीमान आहे. मी आयआयटी अथवा एमबीए करताना प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले नव्हते तर खाजगी क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरवले होते. मात्र जीवन कुठे काय वळण घेणार हे माहित नसते. त्यासाठी आपण करीत असलेल्या कामात आनंद आणि समर्पणभाव असला पाहिजे. जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात रस वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे क्षेत्र निवडू शकता. जे कोणते काम आपण करु त्याबद्द्ल वचनबध्दता, अखंडता आणि नैतिकता असावी तरच आपले काम समर्पण होईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात काम करा, असे त्यांनी शेवटी सांगीतले.

यावेळी बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, निर्धार, समर्पन आणि प्रेम हे गुण एम.बी.बी.एस. सारखी कठीण पदवी मिळविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. एखाद्या कामाच्या सरावातून माणूस पारंगत होतो. हे सातत्याने करण्यासाठी रुग्णसेवेवर भर द्यावा. रुग्णसेवेतून अनेक गोष्टींचे शिक्षण मिळवून वैद्यकीय सेवेत पारंगत होता येते. प्रामाणिकपणे रुग्णसेवा दिल्यास त्यातून आनंद, प्रसिध्दी आणि अर्थप्राप्ती होते. वैद्यकीय शाखेत 25 टक्के शिक्षण हे शिक्षकांकडून, 25 टक्के स्वयं अध्ययनात, 25 टक्के रुग्णसेवेतून तर 25 टक्के ज्ञान येणाऱ्या काळात मिळते. डॉक्टर हा वैद्यकीय शाखेचा तज्ज्ञ म्हणून 20 टक्के तर माणूस म्हणून 80 टक्के योगदान देत असतो असे डॉ. कराड म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. हनुमंत किनिकर म्हणाले की, माईर्स एमआयटी या संस्थेमुळे हजारो डॉक्टर घडले असून ते आज देश, विदेशात सेवा देत आहेत. आजचे युग हे सुपरस्पेशालिटी असल्याने त्यादृष्टीने वाटचालीसाठी प्रयत्न करावेत. शिवाय वैद्यकीय सेवे बरोबर संशोधनाकडे लक्ष केंद्रित करावे. रुग्ण, नातेवाईकांशी संवाद ठेवून प्रामाणीकपणे रुग्णसेवा करावी. लातूर येथे आजही किडनी, लिव्हर, ह्रदय प्रत्यारोपन सुविधा उपलब्ध नाही. ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे किनिकर म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले की, जो माणूस जीवनात कामाचा आनंद घेतो तो चांगला जगतो. वैद्यकीय शिक्षणात घातलेला वेळ हा रुग्णांचे दु:ख दूर करतो. या जगात अनेक चांगले लोक आहेत. आपण चांगले होणे गरजेचे आहे. आपल्यासाठी जगातली सर्वात मोठी माणसे ही आपले आई – वडिल असतात. वाईट काळात तेच आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतात असे डॉ. लहाने म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. अशोक आरदवाड म्हणाले की, एम.बी.बी.एस. ची पदवी पुर्ण करणे हा आयुष्यातील मोठ्ठा टप्पा आहे. या आनंदामागे आई – वडिल आणि गुरुजन आहेत. त्यांना विसरु नका. वैद्यकीय शिक्षणात खुप वेळ जातो आणि पुढील आयुष्य रुग्णसेवेत जाते. डॉक्टरचे आयुष्य खडतर आणि समाजसेवेचे आहे. त्याचा आनंद घ्यावा असे डॉ. आरदवाड म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. चिंते म्हणाले की, एम.बी.बी.एस. नंतर पुढे पीजी करुन डॉक्टरच व्हावे असे नाही तर इतर मार्ग निवडून यशस्वी होता येते. सध्या जगाला मानवी मुल्य देण्याचे काम भारत करीत असल्याचे ते म्हणाले.       

यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एम.बी.बी.एस. स्पंदन 2016’ या बॅचच्या पदवीधरांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. हनुमंत कराड यांनी पदवीप्रदान विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेची शपथ दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय काठोळे, डॉ. पराग टिपरे, डॉ. गायत्री सुर्वे, डॉ. श्रध्दा गरकल यांनी केले तर आभार डॉ. नम्रता गुर्ले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.