डोळ्यांची नियमित तपासणी हा काचबिंदूवर सर्वोत्तम उपाय
नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांचे मत; काचबिंदू सप्ताहानिमत्त लातूर शहरात जनजागृती फेरी
लातूर – अनुवांशिकता, डोळ्याला मार लागणे, 40 च्या पुढील वय, मधुमेह, डोळ्यांत वाढलेला दाब या कारणांमुळे काचबिंदू होतो. काचबिंदूमुळे गेलेली नजर कुठल्याही उपचाराने परत आणता येत नाही. त्यामुळे नियमित डोळे तपासणी हा काचबिंदूवर सर्वोत्तम उपाय आहे. काचबिंदूचे वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास काचबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वाला टाळता येते, असे मत एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी व्यक्त केले.
जागतिक काचबिंदू सप्ताहानिमीत्त एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा नेत्र तज्ज्ञ संघटना, महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, डी. एस. कराड आय इन्स्टिट्युट, लायन्स हेल्थ् केअर कॅम्प्स, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 11 मार्च रोजी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधी चौक या मार्गावर जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. हनुमंत कराड बोलत होते. या वेळी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, जिल्हा नेत्र तज्ज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजीराव काळगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉ. उदय मोहिते, नेत्र तज्ज्ञ डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. योगेश तोष्णीवाल, डॉ. मयुर कुलकर्णी, डॉ. अनिल स्वामी, डॉ. विश्वनाथ केंद्रे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
काचबिंदू हा डोळ्यातील मागील नसेला होणारा आजार आहे. या आजारात डोळ्याच्या आतील दाब वाढून डोळ्याची मुख्य प्रकाश संवेदना वाहून नेणारी नस खराब होते. काचबिंदूच्या प्राथमीक अवस्थेत रुग्णांला कोणताही त्रास होत नाही. सुरुवातीला डोळ्यामध्ये काचबिंदूची प्रक्रिया हळूवारपणे सुरु होते. मात्र हळू – हळू नजर कमी होत जाते, असे सांगून या वेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, काचबिंदूवर वेळेत उपचार न केल्यास अंधत्त्व देखील येवू शकते. काचबिंदू हा डोळ्यातील छुपा दुष्मण असून या आजाराचा विशेष त्रास नसल्याने बहुते रुग्णांना हा आजार झाल्याचे समजून येत नाही. काचबिंदूवर निदाना अभावी वेळेत उपचार न झाल्याने हळू – हळू दृष्टी कमी होऊन डोळा अंधत्तवाकडे वाटचाल करतो.
काचबिंदूमुळे रुग्णांला विशेष त्रास होत नसला तरी वारंवार डोळे दुखणे, अजूबाजूची नजर कमी होणे, डोळा लाल होणे, पाणी येणे, ही लक्षणे या रोगाची कल्पना देत असतात. मधुमेही रुग्ण, वाढते वय, कुटूंबात काचबिंदू असणाऱ्यांना काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी नियमितपणे नेत्र तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करुन घेणे अवश्यक आहे. जेणेकरुन वेळेत रोगाचे निदान होवून योग्य उपचार घेता येतील, असे डॉ. कराड म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. श्रीधर पाठक म्हणाले की, काचबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांतील दाब नियंत्रीत करुन काचबिंदूची वाढ थांबवता येते. नेत्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने ड्रॉप अथवा शस्त्रक्रिया करुन दाब नियंत्रित करता येतो. काचबिंदू झालेल्या रुग्णांनी आयुष्यभर नेत्र तज्ज्ञाच्या संपर्कात राहून नियमित उपचार घ्यावेत, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभवी चुरी यांनी केले तर आभार डॉ. हर्षल अंबाडे यांनी मानले. यावेळी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधी चौक या मार्गावर फेरी काढून काचबिंदू विषयी जागृती करण्यात आली. या फेरीत एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग, जिल्हा नेत्र तज्ज्ञ संघटना, महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालय, डी. एस. कराड आय इन्स्टिट्युट व लायन्स हेल्थ् केअर कॅम्प्स, लातूर येथील नेत्र तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.