मुख: शल्य तज्ज्ञांकडून मौखिक रोगांचे समूळ उच्चाटन मुख: शल्य तज्ज्ञ दिन विशेष
डॉ. अमोल डोईफोडे,
मुख: शल्य चिकित्सा तज्ज्ञ,
माईर्स एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालय,
लातूर.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीतून विविध आजार निर्माण होत आहेत. अशा आजारांमुळे शरीरावर होणाऱ्या प्रादूर्भावाचे परिणाम चेहऱ्यावर, तोंडावर व दातांवरती प्रकर्षाने होऊन मौखीक रोगांची गुंतागुंत वाढत आहे. परिणामी तोंडातील, दातांमधील रोंगातही वाढ होत आहे. तोंडातील प्रमुख जबडा, दात, हिरडी, ओठ व गाल यांना जडलेला कर्करोग, जबड्याच्या गाठी, अडकलेली अक्कल दाढ, चट्टे, व्रण अशा रोगांचे आणि निखळलेला सांधा, रस्ता अपघातामुळे चेहऱ्यावर व जबड्यांना होणारी गंभीर दुखापत, तुटलेला जबडा अशा दुखापतींचे समुळ उच्चाटन मुख: शल्य चिकित्सेतून करता येते.
दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय मुख: शल्य तज्ज्ञ दिवस म्हणून साजरा केला जातो. “रस्ता सुरक्षा जागरुकता” हे यावर्षीच्या दिवसाचे घोषवाक्य असून या निमित्ताने अपघातग्रस्त रुग्णांवरील उपचारात मुख: शल्य तज्ज्ञांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. सामान्यता अपघातग्रस्त रुग्णास चेहऱ्यावर व जबड्यांना इजा झाल्यास त्यासाठी त्वरीत लागणाऱ्या उपचाराबद्द्लची माहिती नसल्याने प्रथमोपचारापासून अनेक रुग्ण वंचित राहतात. म्हणूनच या दिनाच्या निमित्ताने मुख: शल्य तज्ज्ञांकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या उपचारांविषयी वेध घेणारा हा लेख…
अपघातामुळे चेहरा, जबड्यास होणारी गंभीर दुखापत
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अपघातात लक्षणीय वाढ होवून शरीर, चेहरा, जबडा व दातांचे भरुन न येणारे नुकसान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अपघातात खालचा – वरचा जबडा तुटून चेहऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. अशा रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध झाल्यास अपघातामुळे बिघडलेला चेहरा, तुटलेला जबडा यावर शस्त्रक्रिया करुन चेहऱ्याची ठेवण पुर्ववत करता येते.
मुख – दंत रोगाची लक्षणे
प्रामुख्याने मुख व दंत रोगात अचानक दातामध्ये वेदना होणे, हिरड्यांवर सुज येणे, पु येणे, जबड्यामध्ये गाठ तयार होणे, तोंडात चट्टे, व्रण येणे, तोंड कमी उघडणे अशी लक्षणे दिसून येतात. तोंडातील अशा आजारांचे वेळीच निदान न झाल्यास रुग्णास मोठ्या हानीस सामोरे जावे लागते.
मुख – दंत रोग उद्भवण्याची कारणे
मौखीक अस्वच्छता, बदलती जीवनशैली, अपूर्ण झोप, संतुलीत आहराचा अभाव, व्यसनाधिनता, अपघात आणि प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष या कारणांमुळे मुख – दंत रोग उद्भवतात.
मौखिक रोगांचे अचूक निदान आवश्यक
तोंडाचे अथवा दातांचे आजार आढळून आल्यास मुख: शल्य तज्ज्ञांकडे दाखवून आजाराचे अचूक निदान करुण घेणे गरजेचे असते. काही रुग्णांमध्ये आवश्यकनुसार क्ष – किरण तपासणी, रक्त तपासणी, बायप्सी, गाठीतील पाण्याची तपासणी करुन आजाराचे निदान होणे आवश्यक असते.
मुख – दंत रोगांवरील उपचार
संपूर्णता खराब झालेल्या दातांवरती दात काढण्याशिवाय दूसरा पर्याय शिल्लक राहत नाही. अलीकडील काळातील आजारांतील बदलांमुळे काही रुग्णांत जबड्यातील अपुऱ्या जागेमुळे अक्कल दाढेच्या वाढीमध्ये अडथळे निर्माण होऊन तीव्र वेदना होतात. अशा रुग्णांच्या अक्कल दाढेवर शस्त्रक्रिया करुन अजुबाजूंच्या दातांची हानी टाळता येते.
लहान मुलांमध्ये खेळताना अपघात होऊन तोंडात, दातांत इजा होते. इजा झालेल्या भागाचा रक्त पुरवठा खंडीत होऊन दात संपूर्णता निर्जीव होतात, दातांचा रंग बदलून दातांखाली, ओठामध्ये लहान – लहान गाठी तयार होतात. असे दात व गाठींवर शस्त्रक्रिया करुन उपचार करता येतात.
जबड्याच्या अपुऱ्या वाढीमुळे बिघडलेली ठेवन शस्त्रक्रियेद्वारे व्यवस्थित करता येते. लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत अनेकांना तोंडाच्या आतील ओठांचा आणि गालाचा भाग चावला गेल्याने सुध्दा लाळीच्या ग्रंथीच्या गाठी वारंवार निर्माण होतात. अशा गाठींवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात. तसेच तोंडाच्या विविध आजारांची कारणे ओळखून शस्त्रक्रिया करुन आजाराचे मुळासकट निर्मूलन करता येते.
व्यसनाधिनतेमुळे तोंडाच्या कर्कगात वाढ
अतिरिक्त प्रमाणातील व्यसनाधिनतेमुळे हिरड्या, जबडा, दातांचे हाड, गाल, ओठ, जीभ या भागास अनेक रुग्णांमध्ये कर्करोग आढळून येत आहे. अशा स्वरुपातील कर्करोगास वेळीच प्रतिबंध व उपचार न केल्यास रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ येते. तोंडाच्या कर्करोगात शस्त्रक्रियेबरोबर रेडिओ, केमोथेरपी उपचाराची गरज भासू शकते. कर्करोगाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इम्यूनो थेरपी ही अत्याधुनिक उपचार पध्दती सुध्दा अवलंबली जाते.
मुख रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय फायदेशीर
तोंडात निर्माण होणारे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया या अत्यंत गुंतागुंतीच्या असल्याकारणाने अशा आजारावर प्रतिबंधात्मक उपचार फायदेशीर ठरतात. कर्करोगासारख्या दूर्धर आजारावर एवढे संशोधन होऊनही कर्करोगामुळे होणारी हानी टाळता येत नाही. त्यामुळे कर्करोग उद्भवू नये म्हणून व्यसनांपासून दूर राहावे. वाहन चालवताना सुरक्षा उपायांचा अवलंब करावा. जेणेकरून अपघातामुळे होणारी हानी टाळता येईल. लहान वयात झालेल्या इजांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच वेळोवेळी तोंड व दातासबंधी उद्भवणाऱ्या आजाराविषयी जागरूक राहून उपचार घ्यावेत.
शब्दांकन: श्रीधर घुले, लातूर.