आनंदी जीवनासाठी महिलांनी गरोदरपणात घ्यावी मौखिक आरोग्याची विशेष काळजी

आनंदी जीवनासाठी महिलांनी गरोदरपणात घ्यावी मौखिक आरोग्याची विशेष काळजी

आनंदी जीवनासाठी महिलांनी गरोदरपणात घ्यावी मौखिक आरोग्याची विशेष काळजी
आनंदी जीवनासाठी महिलांनी गरोदरपणात घ्यावी मौखिक आरोग्याची विशेष काळजी
डॉ. प्राजक्ता गायकवाड
बाल दंतरोग तज्ञ, बाल दंतरोग विभाग,
एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालय, लातूर.
महिला दिन हा केवळ आनंदोत्सव साजरा करण्याचाच नाही तर महिलांच्या मौखिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक दिवस आहे. सध्याचे धावपळीचे जीवन आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये महिला अनेकदा स्वतःकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्या शारीरिक आणि मौखिक आरोग्य यासारख्या समस्यांना बळी पडू शकतात. खास करून गर्भधारणेच्या काळात मौखिक व दंत आरोग्याला प्राधान्य देऊन आनंदी आणि संतुलित जीवन जगू शकतात. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मौखिक व दंत आरोग्य याविषयाचा वेध घेणारा डॉ. प्राजक्ता गायकवाड यांचा हा विशेष लेख..!
गरोदरपणात मौखिक आरोग्य हे सहसा डॉक्टर, दंत वैद्य आणि स्वत: गरोदर मातेमुळे दुर्लक्षीत होते. त्यामुळे भावी आयुष्यात माता व बालक या दोघांना मुख – दंत समस्या निर्माण होऊ शकतात. गरोदरपणात इतर संपूर्ण शरीराप्रमाणे मौखिक आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे असते. मातांमधील कॅरिेओजेनिक जिवाणू संसर्गामुळे येणाऱ्या नवजात बालकास दंत क्षय होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेने इतर तपासण्याप्रमाणे मौखिक आरोग्य तपासणीही करणे गरजेचे आहे. गर्भधारणे दरम्यान योग्य दंत उपचार आणि योग्य ती खबरदारी घेतल्याने दंत क्षयाचा धोका कमी होतो.

गरोदरपणात उद्भवणाऱ्या मुख – दंत समस्या
१.  दातांची झीज (Enamel Erosion) -
गर्भधारणे दरम्यान बऱ्याचदा गॅस्ट्रीक आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे दातांवरील पहिला थर नष्ठ होण्यास सुरुवात होते. गर्भधारणेच्या प्रारंभीच्या काळात मॉर्निंग सिक्नेस होणे सामान्य आहे. शरीरातील हार्मोनल बदलामुळे आम्ल ओहोटी वाढून मळमळणे, उलटी होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात आहार आणि जीवन शैलीत बदल करणे गरजेचे आहे. आवश्यकते नुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने अँण्टीइमेटिक्स व अँण्टासिड् ही औषधे घेऊ शकता. आहारात अम्लीपदार्थाचे सेवन कमीत कमी करणे गरजेचे आहे. एक कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून गुळण्या केल्याने अम्ल निष्प्रभ होऊन मळमळ, उलट्या होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, सौफ्ट ब्रिसल्स असलेली टूथब्रश वापरल्यामुळे इनॅमल इरोजन रोखता येईल. ॲण्टीसेन्सिटीव माऊथवॉशचा वापर करावा. त्यामुळे सळसळणाऱ्या दातांचे संरक्षण होईल व दातांवरील जिवाणूंचे प्रमाण कमी होईल.

२. दंतक्षय (Dental Caries) –
गरोदरपणात एक चतुर्थांश स्त्रियांना दंत क्षय होतो. हा एक मौखिक रोग आहे. ज्या मातांमध्ये दंत क्षयाचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या मुलांना येत्या काळात दंतक्षय होण्याचा धोका अधिक असतो.
आहारातील कार्बोहायड्रेट तोंडी जिवाणूंच्या माध्यमातून अम्लामध्ये अंबवले जातात. जे इनॅमलचे डीमीनरलायझेशन करते व दंतक्षय होण्यास सुरुवात होते. तसेच त्याशिवाय इतर अनेक कारणांमुळे गर्भवती महिलांना दंतक्षय होण्याचा धोका वाढतो. त्यामध्ये साखर युक्त आहाराची लालसा, तोंडी पोकळी मध्ये वाढलेली अम्लता, सतत थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केल्याने दंतक्षय होण्यास सुरुवात होते.
      सुरुवातीच्या काळात दंतक्षय होण्यापुर्वी दातांवर पांढरे डाग पडतात. त्यानंतर त्याच भागामधील दातांचे डीमीनरलायझेशन होऊन ते तपकीरी रंगाचे दिसतात. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्याठिकाणी दंतक्षय होतो. पुढे त्याचे रुपांतर ॲब्सेस व सेल्युलायटिस मध्ये होते.
      गर्भवती महिलांनी फ्लोराईडयुक्त पेस्टने दररोज सकाळी व रात्री नियमितपणे ब्रश करावा, साखरयुक्त पदार्थ (उदा. चॉक्लेट, बिस्किट, पेस्ट्रीज) मर्यादित प्रमाणात खावेत, दिवसातून दोन वेळा माऊथवॉशचा वापर करुन गुळण्या कराव्यात, अम्लयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे, दातां मध्ये दंतक्षय झाला असेल तर वेळीच दंतरोग तज्ञांकडून उपचार घ्यावेत.

३. हिरड्यांना सुज येणे (Gingivitis) –
गर्भवती महिलांमध्ये हिरड्यांना सुज (Gingivitis) येणे सर्वसामान्य आहे. गर्भधारणे मध्ये याचे प्रमाण हे ६० ते ७५  टक्यापर्यंत वाढते. हिरड्यांना सुज येणे, हिरड्या लाल होऊन रक्त येणे, ब्रश करताना हिरड्यांतून रक्तस्त्राव होणे, श्वासातून दुर्गंधी येणे, जळजळ होणे ही लक्षणे दिसून येतात. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या चढ उतारामुळे गर्भधारणे दरम्यान हिरड्यांना सुज येण्याबरोबर वरील प्रमाणे लक्षणे दिसून येतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी या काळात तोंडाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. त्यामध्ये दररोज दोन वेळा ब्रश करणे, डेन्टल फ्लॉसचा वापर करणे, माऊथ वॉशचा किमान दोन वेळा वापर करावा, मल्टी विट्यामिन्स गोळ्यांचा समावेश करावा व दंत रोग तज्ञांकडून तपासणी करून दातांची स्वच्छता करुन घ्यावी.
४. हिरड्यांचा आजार (Periodontitis) –
मौखिक आरोग्याकडे दिर्घकाळ दुर्लक्ष केल्याने दातांच्या सभोवतील हिरड्यांना संसर्ग होऊन पायरिया म्हणजेच हिरड्यांचा आजार होतो. दातांवर प्लाक जमा झाल्याने हा आजार उद्भवतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास हिरड्यांतून रक्त येवून दातही गमवावे लागू शकतात. गरोदरपणात या आजाराचे प्रणाण 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढते.
      तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने हिरड्यांचा आजार होतो. त्यामुळे जिवाणू दाताच्या काटावर (Edges) प्लाक तयार करतात. योग्य वेळी निदान झाले नाही तर प्लाक कॅल्सिफाईड होऊन त्याचे रूपांतर टारटर मध्ये होते. केवळ मौखिक अस्वच्छतेमुळे नव्हे तर हार्मोन्सच्या असंतुलन व ताण-तणाव यामुळे देखिल हा आजार होऊ शकतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळी व गरोदरपणात हार्मोन्सचे असंतुलन दिसून येते. त्याचबरोबर गरोदरपणात सायटोकाईन्स, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, इंटरल्युकिन्स या इंफ्लामेट्री मेडिएटर्स यांच्या प्रमाणात वाढ होऊन हिरड्यांवर सुज येते.
      दातांवर पिवळसर होणे, प्लाकचा संचय होऊन दातांवर कठीन टारटर जमा होणे, मुख दुर्गंधी येणे, हिरड्यांमधुन रक्तस्त्राव व वेदना होणे, हिरड्यांची हळु हळु झिज होणे, दात सैल होणे, अशी लक्षणे दिसून येतात.
हिरड्यांच्या आजाराच्या प्रथमावस्थेत व्हिज्युअल तपासणीव्दारे हिरड्यांची स्थिती माहिती करुन घेतली जाते. हिरड्यांच्या आजाराची स्थिती दांतामध्ये जमा झालेल्या प्लाक वरुन समजते. त्यानंतर त्याचे रुपांतर कॅल्क्युलस मध्ये होते. मात्र नुसते ब्रश करण्याने ते निघुन जात नाही तर दंत वैद्याकडून तपासणी करुन घेणे आवश्यक असते. हाडांची झिज व प्लाकची स्थिती समजून घेण्यासाठी एक्सरे करणे गरजेचे असते. जमा झालेला प्लाक व कॅलक्युलस दंत वैद्य दातांची सफाई करुन काढून टाकतात. प्लाक जमा होण्यापासून संरक्षण होण्यासाठी दातांची नियमित स्वच्छता करणे व फ्लॉसिंग करणे आवश्यक आहे. दातांच्या स्वच्छतेनंतर (Scaling & Root Planning) दर तीन महिन्यांनी दंत वैद्याकडे तपासणी करुन घ्यावी.
शब्दांकन : श्रीधर घुले, लातूर.