मुख-दंत रोग टाळण्यासाठी नियमित तपासणी करा - डॉ. रोहिणी दिवेकर यांचे आवाहन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात मुख औषध वैद्यक शास्त्र व क्ष – किरण शास्त्र दिन साजरा

मुख-दंत रोग टाळण्यासाठी नियमित तपासणी करा - डॉ. रोहिणी दिवेकर यांचे आवाहन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात मुख औषध वैद्यक शास्त्र व क्ष – किरण शास्त्र दिन साजरा

मुख-दंत रोग टाळण्यासाठी नियमित तपासणी करा - डॉ. रोहिणी दिवेकर यांचे आवाहन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात मुख औषध वैद्यक शास्त्र व क्ष – किरण शास्त्र दिन साजरा

लातूर - प्रत्येकाला शारीरिक समस्यासोबत मुख - दंत रोगांचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी नियमितपणे दात व तोंडाची दररोज दोनवेळा स्वच्छता करणे गरजेचे आहे. मुख-दंत रोग होण्यापुर्वी व दंत रोगाची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ मुख व दातांची दंत वैद्यांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुख औषध वैद्यक शास्त्र व क्ष – किरण शास्त्र तज्ञ डॉ. रोहिणी दिवेकर-शिरोळे यांनी केले.

येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख औषध वैद्यक शास्त्र आणि क्ष – किरण शास्त्र विभाग येथे मुख औषध वैद्यक शास्त्र व क्ष – किरण शास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. रोहिणी दिवेकर-शिरोळे बोलत होत्या. यावेळी डॉ. अर्चना आपटे, डॉ. स्नेहा जाधवर या उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना डॉ. रोहिणी दिवेकर-शिरोळे म्हणाल्या की, मानवी मुखाची, दातांची रचना आणि ठेवण ही अत्यंत गुंतागुंतीची असल्याने मुख – दंत रोगाचे निदान करणे क्लिष्ट असते. बहुतेकवेळा तोंडामध्ये व दातात होणारे आजार प्रथमावस्थेत कळून येत नाहीत. यामुळे मुख व दातांचे भरुन न निघणारे नुकसान होते मात्र संबंधीत दंत रोगाची लक्षणे रुग्णांना जाणवत नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने किमान सहा महिन्यातून एकदा तरी दंत वैद्याकडून तपासणी करून घ्यावी.

तोंड व दातांची अस्वच्छता, जंतू संसर्ग, व्यसनाधिनता, अपघात, अपूर्ण झोप, संतुलीत आहाराचा अभाव, जंकफुड, डबाबंद खाद्यपदार्थांचे सेवन, रसायनयुक्त शीतपेयांचा अतिवापर, इतर शारीरीक आजार, बदलती जिवनशैली, चुकीचे पध्दतीने ब्रश करणे आणि प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करणे या कारणांमुळे मुख – दंत रोग होतात.

मुख व दंत रोग उद्भवल्यानंतर दात व दाढांमध्ये वेदना होणे, दात किडणे व हलणे, दातांची झिज होणे, हिरड्यांना सुज येणे, हिरड्यांमधून पू येणे, पांढरे - लाल चट्टे, तोंडात गाठ तयार होणे, जबड्याचे सांधे, स्नायु दुखणे, तोंडातील जखमा, व्रण येणे, तोंड कमी उघडणे, तोंड बंद न होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास दंत वैद्याकडून तपासणी करून आवश्यक उपचार घ्यावेत. त्याचबरोबर पुढील काळात नियमितपणे तपासणी करुन घ्यावी. दंत रोगांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास दात कायमस्वरूपी गमवावे लागू शकतात, तोंडातील लाल-पांढऱ्या चट्ट्यांचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते.

दंत रोग उद्भवल्यानंतर त्याच्या अचुक निदानाासाठी व दातांच्या मुळा खालील किड, हिरड्यांच्या हाडाची झिज पाहण्यासाठी तोंडातील क्ष – किरण ही तपासणी करणे आवश्यक असते. तसेच संपूर्ण दात, जबड्याच्या हाडांची झीज, तुटलेला जबडा, जबड्यांचा सांधा पहाण्यासाठी संपूर्ण दातांची क्ष – किरण तपासणी केली जाते. त्याचबरोबर संपूर्ण चेहऱ्यासाठी CBCT ही अत्याधुनिक संगणकीकृत तपासणी करुन गुंतागुंतीच्या मुख – दंत रोगांचे अचूक निदान करता येते, असेही डॉ. रोहिणी दिवेकर-शिरोळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक राहुल कराड, क्ष – किरण तंत्रज्ञ लक्ष्मण सोनवणे, किशोर मुसळे, परिचारीका पुजा नागरगोजे, उज्ज्वला पवार, सेवक सावित्रा घुले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास दंत रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.