वारकरी सांप्रदाय एकात्मता आणि शांतीचा संदेश देईल प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
वारकरी सांप्रदाय एकात्मता आणि शांतीचा संदेश देईल प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
लातूर - देशाला जातीवादाचा मोठा शाप लागला आहे. अशा वेळेस हिंदू मुस्लिम आणि इतर धर्मीयांचे नागरिक या सप्ताहात सहभागी होऊन एक नवीन इतिहास घडविला आहे. हाच सांप्रदाय संपूर्ण जगाला एकात्मता आणि शांतीचा संदेश देईल. भविष्यात रामेश्वर हे गाव राम रहिम केंद्र म्हणून उदयास येईल.” असे विचार विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व समस्त गावकरी मंडळ, रामेश्वर यांच्या वतीने मानवतातीर्थ म्हणून साकार झालेल्या रामेश्वर (रूई) येथे संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन ३ ते१० मे या कालावधीत करण्यात आले होते. याच्या सांगता समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी आमदार रमेशअप्पा कराड, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय कुमार दास, ह.भ.प.श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, कमाल राजेखाँ पटेल, प्रा.स्वाती कराड चाटे व राजेश कराड उपस्थित होते.
संपूर्ण सप्ताह प्रसंगी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणारे ८० बालकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच, रिजा पटेल यांनी लिखित ‘जीवन’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, मानवतीर्थ म्हणून ओळखले जाणारे रामेश्वर गावात आज अयोध्या येथील श्रीराम अवतरल्याचे अनुभूती होत आहे. महान भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेचा संदेश जगभर पसरविण्याचे कार्य पुणे येथे उभारण्यात आलेल्या डोमच्या माध्यमातून होत आहे. मानवाने आपले अंतरंग व बाह्य जीवनात स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे. मानवाने सदैव प्रसन्न व्यक्तित्व ठेवल्यास जीवनात सुख व समाधान मिळते. मन शुद्धी व श्रध्देतूनच शांती प्रस्थापित होऊ शकते. या सप्ताहात पुढील वर्षापासून सर्व धर्मातील संतांचे प्रवचन सत्र सुरू करण्यात येणार आहेत.”
काल्याच्या कीर्तनात ह.भ.प.उत्तरेश्वर पिंपरीकर महाराज म्हणाले,“ जीवनात अन्नदानाची साधना अत्यंत महत्वाची आहे. या संसारात रममान होताना मानवाने आसक्ती सोडल्यास त्याला आनंद मिळतो. कर्म हेच सर्वश्रेष्ठ असून त्यानुसार आपल्याला फळ मिळते. त्यामुळे सदैव हरिनामच्य उच्चारात चांगले कर्म करत रहावे. विश्वासघात हा जवळच्या व्यक्तीपासूनच मिळतो. त्यामुळे जीवनात सतत सावध राहण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.”
राजेश कराड म्हणाले, सप्तहाचे हे ५वे वर्ष असून गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे. मानवतीर्थ म्हणून प्रसिद्ध रामेश्वर रुई हे गाव आता रामेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जात आहे. पुढील वर्षी हा सप्ताह २२ ते २८ एप्रिल २३ या कालावधीत होणार आहे.
या सप्ताहात ह.भ.प.श्री प्रभाकर महाराज झोलकर, ह.भ.प.भगवान महाराज कराड, ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प विद्यानंद सागर महाराज गातेगावकर, ह.भ.प महादेव महाराज बोराडे, ह.भ.प.त्रिविक्रमानंद शास्त्री, शिरून कासार, ह.भ.प. केशव महाराज घुले, टाकळीकर यांची किर्तन झाली.
सप्ताहाच्या पूर्व संध्येला रामेश्वर व पंचक्रोशितील ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.