मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करण्याची आवश्यकता
मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करण्याची आवश्यकता
मानसिक आजार आणि मानसिक आरोग्य यांच्या बाबतीत आजही समाजामध्ये खूप मोठी उपेक्षेचीच भावना आहे. शारीरिक आजार आणि शारीरिक आरोग्य याच्या बाबतीत मात्र विशेषतः गेल्या काही वर्षात जनजागृतीमुळे निश्चित सुधारणा झालेली आहे. निरनिराळे शारीरिक आजार, त्यांची लक्षणे, त्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय उपचार, व्यक्तीने अशा आजाराच्या बाबतीत आणि एकूणच सर्वसाधारण आरोग्याच्या बाबतीत संवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी स्वतः करायला पाहिजेत याची खूप मोठ्या प्रमाणात जाणीव आजकाल आपणाला सर्वसामान्य लोकांमध्ये देखील दिसते. वजन कमी करण्याचे उपाय, डोळ्यांची काळजी, योगा, प्राणायाम, योग्य आहारासंबंधी निरनिराळ्या पद्धतींचा वापर अशा विविध स्वरूपात लोक काही ना काही तरी आपल्या शारीरिक आरोग्यासाठी माहिती घेत असतात, चर्चा करत असतात आणि प्रत्यक्ष कृती देखील करत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात जरी बदलत्या जीवनपद्धतीमुळे अनेक आजार वाढत असले तरी देखील मोठ्या प्रमाणात माहितीच्या प्रसारामुळे त्याचे निराकरण करणाऱ्या विवीध गोष्टी प्रत्यक्ष करून बघण्याची प्रवृत्ती देखील वाढत चाललेली आहे. जी गोष्ट आपणाला शारीरिक आजार आणि आरोग्याच्या बाबतीत दिसून येते ती गोष्ट आपल्याला मानसिक आजार आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत मात्र दिसून येत नाही.
मानसिक आजार आणि आरोग्याच्या संबंधीच्या अनास्थेमुळे समाजाचे सर्वच पातळ्यांना मोठे नुकसान होते. मानसिक आजाराचा विचार केला तर हे आजार लवकर लक्षात येत नाहीत, त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. तसेच रुग्ण व कुटुंबीयांना या परिस्थितीत कोणत्या गोष्टी करावयाच्या असतात, कोणत्या गोष्टी नाही करायच्या याचीही माहिती अत्यंत तुटपुंजी अशीच असते. त्याचबरोबर गैरसमज, अशास्त्रीय उपाय आणि भोंदूगिरी या गोष्टी देखील मानसिक आजाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. थोडक्यात आजाराची लक्षणे दिसू लागल्यापासून ज्या गोष्टीला वेळेवर वैद्यकीय पद्धतीने हाताळले पाहिजे ती गोष्ट उशिरा आणि चुकीच्या पद्धतीने हाताळली जाते. आजार बळावतो, रुग्णांचे आणि कुटुंबीयांचे खूप नुकसान होते. ही परिस्थिती मानसिक आजारांविषयी जनजागृती करून निश्चितच कमी करता येईल.
अर्थात मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य याविषयीच्या अपुऱ्या माहितीमुळे मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांचेच फक्त नुकसान होते असे नाही तर सर्वसामान्य लोकांना देखील मानसिक आजारांपासून प्रतिबंध कसा करावा, तसेच मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करणे अशा गोष्टीं देखील फारच कमी माहिती असते आणि त्यामुळे या दिशेने शारीरिक आरोग्याच्या बाबतीत जसे सकारात्मक प्रयत्न केले जातात तसे प्रयत्न मानसिक आरोग्याच्या बाबतीत होत नाहीत असे दिसून येते.
नेमक्या याच कारणासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटना आणि अन्य संस्थातर्फे १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या दिवसासाठी एक स्वतंत्र अशी संकल्पना निवडली जाते आणि त्या अनुषंगानेच चर्चा व्हावी, परिसंवाद व्हावेत आणि मानसिक जनजागृती तो विशिष्ट विषय समाजासमोर यावा अशी अपेक्षा असते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य संस्थांनी ‘मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य एक जागतिक अग्रक्रम' असा विषय निवडलेला आहे. १० ऑक्टोबर ला जोडून येणारा आठवडा किंवा किंबहुना संपूर्ण महिना या विषयावर विविध कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा आहे.
आपल्याकडे बऱ्याच वेळेला मानसिक आजारी व्यक्ती आणि आजार नसलेली व्यक्ती अशा द्वि विभाजनाच्या दृष्टीकोनातून बघितले जाते. खरं बघितलं तर प्रत्येकासाठीच मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य महत्त्वाचे असते. तसेच प्रत्येकाच्या बाबतीत मानसिक आरोग्यामध्ये चढ-उतार होत असतात. अशा चढ-उताराला परिस्थितीजन्य कारणे तसेच व्यक्तीचा स्वभाव, सवयी आणि दृष्टिकोन हे ही कारणीभूत असतात. थोडक्यात मानसिक आरोग्याचा अगदी कमी प्रतीचे मानसिक आरोग्य ते उच्च प्रतीचे मानसिक आरोग्य असा जो एक मोठा स्पेक्ट्रम आहे. त्यावर आपण सर्वजण वावरत असतो. एका बाजूला टोकाचा मानसिक त्रास किंवा अस्वस्थता ते कमी कमी होणारा त्रास आणि त्यानंतर केवळ आरोग्य नाही तर आनंददायी / समाधानी / परिपूर्ण असे मानसिक स्वास्थ्य असा तो संपूर्ण तो आहे.
मानसिक आजार आणि आरोग्य याविषयी समाजात फारशी माहिती नसल्यामुळे, चर्चा होत नसल्यामुळे फक्त मानसिक आजारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचेच नुकसान होत नाही तर सर्वसामान्य लोकांचेही होते. कारण माहितीच्या अभावामुळे मानसिक स्वास्थ्याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. जगातील अनेक मानसशास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की, गेल्या काही दशकांमध्ये रोजच्या जीवनातील जीवघेणी स्पर्धा, इंटरनेट, मोबाईल यांचे आपल्या वेळेवर झालेल्या आक्रमणाने आणि त्याचा अनावश्यक वापर अशा विविध गोष्टींमुळे रोजच्या जीवनातील ताण वाढत आहे. जीवनाचा निख्खळ आनंद, लय आणि सूर हरपत आहे. अशी परिस्थिती राजकारणातील व्यक्ती, उद्योग संस्थातील वरिष्ठ पदावरील व्यक्ती किंवा अन्य अति जबाबदारीची कामे करणाऱ्या लोकांच्या बाबतीतच नाही तर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत देखील आहे. अशा विविध गोष्टींमुळे सामान्य व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य हे देखील हरपलेले आहे, हरपत आहे.
अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच स्वतःच्या मनाची काळजी घेणारी कौशल्ये माहित असणे आणि ती वापरता येणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील एक अग्रगण्य मनोविकार तज्ञ डॉ. श्रीनिवास मूर्ती यांनी प्रत्येकाने स्वतःच्या मनाची अथवा भावनिक काळजी घेण्यासाठी काय करावे याचे काही मुद्दे निश्चित केले आहेत. रोजच्या रोज पुरेसा व्यायाम करणे, आरोग्यदायी आहार घेणे, सात ते आठ तास झोप घेणे या एरवी माहीत असणाऱ्या गोष्टी त्याच्यात आहेतच. पण त्याशिवाय स्वतःच्या साचलेल्या भावनांविषयी जागरूक असणे, इतरांबरोबर त्या शेअर करुन हलके होणे, त्याचा निचरा करणे, आवश्यकते प्रमाणे स्वतःच्या मानसिक अवस्थेमधील चढ-उतार डायरीमध्ये लिहिणे, अनेक बाबतीत इतरांची किंवा परिस्थितीची आपल्याला मदत झालेली असते या बाबतीत 'कृतज्ञता डायरी' लिहिणे, समाजातील विविध लोकांशी कनेक्टेड राहणे अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या रुटीनमध्ये आणणे आवश्यक आहे.
अनावश्यक स्पर्धेमुळे, अनेक गोष्टी करण्याची ओढ ठेवल्यामुळे, शहरातील गर्दीमुळे, वेळेच्या अभावामुळे आणि तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे काही प्रमाणात व्यक्तींवर ताण येणे हे होतच राहणार आहे आणि त्यामुळेच स्वतःची काळजी घेणारा, स्वतःला आनंददायी आणि निकोप मानसिक आरोग्याकडे सातत्याने नेणारा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून तो राबवणे, त्याचा फॉलोअप घेणे हे देखील तितकेच आवश्यक झाले आहे. अनेक जणांना विविध प्रकारची उद्दिष्टे - ऑफिस मधील, सामाजिक कामातील, रोटरी सारख्या क्लब मधील किंवा अन्य प्रकारची उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून काम करायला आवडते. अतिव्यग्रता हे जणूकाही त्यांच्या जीवनाचे ध्येय झाले असते. परंतु स्वतःसाठी मात्र वेळ काढणे हे त्यांना वेळेचा अपव्यय आहे असे वाटते. खरंतर स्वतःसाठी नियोजनबद्ध वेळ जर प्रत्येकाने काढला तर अनावश्यक येणारा ताणतणाव हा तर कमी होईलच परंतु त्याच बरोबर जी उद्दिष्टे साध्य करायची आहे ती उद्दिष्टे देखील चांगल्या पद्धतीने साध्य होतील.
याच साठी आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण असा निश्चय करु या की मानसिक आरोग्य आणि त्याचे संवर्धन हा माझा रोजच्या जीवनातील अग्रक्रम असणार आहे. त्यासाठी मी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणार आहे. असे प्रयत्न करणे हे माझ्या स्वतःसाठी तर भल्याचे असणार आहेच. परंतु माझ्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी देखील ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. अनिल वर्तक
अध्यक्ष,
एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे.