सीबीसीटीच्या माध्यमातून मौखिक रोगांचे अचूक निदान - डॉ. प्रशांत शिर्के यांची माहिती; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात मुख क्ष – किरण शास्त्र कार्यशाळा

लातूर - सीबीसीटी म्हणजेच कोनबीन कॉम्पुटेड टोमोग्राफी हे मौखिक तपासणीचे अत्याधुनीक उपकरण आहे. क्ष – किरणाव्दारे जबड्यांची व मुखाची ३ – डी डायमेन्शन स्वरुपात चाचणी करण्यात येते. सीबीसीटी मशीनच्या माध्यमातून केलेल्या चाचणीतून सर्व प्रकारच्या मौखिक रोगांचे अचूक निदान करता येते, अशी माहिती मुंबई येथील मुख औषध शास्त्र व क्ष – किरण शास्त्र तज्ज्ञ डॉ. प्रशांत शिर्के यांनी दिली.
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख औषध शास्त्र व क्ष – किरण शास्त्र विभाग आणि भारतीय मुख औषध शास्त्र व क्ष – किरण शास्त्र महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या वतीने तीन दिवशीय सीबीसीटी कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत शिर्के बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे प्रतिनिधी डॉ. शिवानंद दडगे, मुख शल्य तज्ज्ञ डॉ. अमोल डोईफोडे, ओएमडीआर विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी माले यांची प्रमुख उपस्थिती होती.
दातांमध्ये असलेले क्रॅक फ्रॅक्चर तसेच दातांना किडीमुळे होणारे अपाय, दाताच्या बाजूला असलेल्या हाडांमधील अपायांचे प्राथमीक अवस्थेत निदान होऊ शकते. प्राथमीक अवस्थेत निदान झाल्यामुळे उपचार लवकर होतो व त्यामुळे होणारा त्रास व हानी न होता रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. प्रशांत शिर्के म्हणाले की, अपघातामुळे जबड्याला व मुखाला झालेल्या दुखापतीचे योग्य निदान या उपकरणाव्दारे होते. त्यामुळे योग्य उपचार पध्दती लवकर अवलंबीता येते. हाडात अडकलेल्या अक्कल दाडा तसेच जबड्यांच्या इतर भागात असलेल्या दाढा, उपदाढा व दात यांची अचुक जागा व त्यांचे त्याजवळ असलेल्या रक्तवाहिन्या व मज्जातंतू यांची जागा अचूक दाखवून देते.
३–डी दंत सीबीसीटी चाचणी मधुन मिळणारे एकूण रेडिएशन डोस पारंपारीक सीटी परिक्षणा पेक्षा बरेच कमी असतात. पारंपारीक सीटीच्या तुलनेने सीबीसीटी मध्ये एक्स्पोजरचा वेळ देखील तुलनेने कमी असतो. ३–डी दंत सीबीसीटीचा स्कॅन रुग्णांच्या डोक्याभोवती फिरतो. ज्यामुळे वेगवेगळ्या थरातून प्रतिमा मिळतात. सीबीसीटी मध्ये मिनीटापेक्षा कमी वेळात विविध कोणातून सुमारे १५० इतक्या प्रतिमा कॅप्चर केल्या जातात. या डेटा आधारे दात, तोंड, जबडा, मान, कान, नाक व घसा या अवयवांची ३ – डी प्रतिमा पुर्नबांधणी करण्यासाठी मदत होते.
चांगली प्रतिमा आणि गुणवत्ता आणि अचुकता, तोंडाच्या आरोग्याबद्द्ल समावेशक माहिती, कमी प्रमाणात रेडीएशन हे ३ – डी सीबीसीटी तपासणी करण्याचे फायदे आहेत. त्याचबरोबर जबड्यांचे आकार व परिणाम यांचे अचूक मोजमाप केले जाते. गंभीर आजार दर्शवू शकतो. कृत्रिम दंत रोपणासाठी सीबीसीटी तपासणी करणे महत्त्वाचे असते. उपलब्ध जबड्याचे हाड, मॅक्सीलरी सायनस अर्थात हाडातील नाकाच्या बाजुची पोकळी आणि संवेदी नसा यांचे स्थानिकरण योग्य रित्या करुन दंत रोपनाची जागा निश्चित केली जाते.
या कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य दंत परिषदेच्या वतीने सहभागी संशोधकांना १८ गुण प्राप्त झाले. सूत्रसंचालन स्नेहलता गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. अभय कुलकर्णी यांनी मानले. या कार्यशाळेत विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी माले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. प्रियंका लासुणे, डॉ. रोहिणी दिवेकर, डॉ. सायोज्यता बांगर यांनी सहभाग नोंदवला. या वेळी विभाग प्रमुख डॉ. प्रविणकुमार मरुरे, डॉ. अमोल बडगीरे, डॉ. सुशेन गाजरे, डॉ. राघवेंद्र मेत्री, डॉ. योगेश काळे व डॉ. ओम बघेले हे उपस्थित होते.