हिवाळ्यात सर्दीखोकला-इन्फेक्शन व्हायला नको, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गरोदर महिलांनी खायलाच हवेत हे 5 पदार्थ

हिवाळ्यात सर्दीखोकला-इन्फेक्शन व्हायला नको, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गरोदर महिलांनी खायलाच हवेत हे 5 पदार्थ

हिवाळ्यात सर्दीखोकला-इन्फेक्शन व्हायला नको, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गरोदर महिलांनी खायलाच हवेत हे 5 पदार्थ

घरगुती पदार्थ घ्या आणि गरोदरपणात प्रतिकारशक्ती वाढवा
गरोदरपणात आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे गरजेचे

थंडीच्या दिवसांत आपण वर्षभरासाठी प्रतिकारशक्ती कमावून ठेऊ शकतो असे म्हणतात, याचे कारण म्हणजे या हवेत खाल्लेले चांगले पचते आणि बाजारातही फळे, भाज्या आणि इतरही अनेक घटक सहज उपलब्ध होतात. गर्भवती महिला म्हणजे दोन जीवांचे पोषण करणारी स्त्री. त्यातच थंडीचा काळ म्हणजे जास्ती ऊर्जा खर्च होण्याचा कालावधी. या काळात गर्भाची आणि स्वत:ची तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी गर्भवतींनी विशेष काळजी घ्यायला हवी. आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास गर्भाच्या वाढीसाठी आणि आपली तब्येत चांगली राहण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूया गर्भवतींनी थंडीत आवर्जून खायला हव्यात. या पदार्थांच्या सेवनामुळे गर्भवती महिलांना थंडीच्या दिवसांत होणाऱ्या ताप, सर्दी आणि इतरही व्हायरल इन्फेक्शन्सपासून दूर राहण्यास मदत होते. शरीरात पाण्याची कमतरता आणि हवामान बदल यांमुळे प्रतिकारशक्ती भरुन येण्यास या पदार्थांचा अतिशय चांगला फायदा होतो. पाहूयात हे घटक कोणते...

लसूण - गर्भवती महिलांना ९ महिन्यांच्या कालावधीत पोटात गॅसेस होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाची वाढ होते तसा पोटाचा भाग जड होत असतो. आता तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की या कालावधीत लसूण खायला हवा, त्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते. याचे कारण म्हणजे लसणात सल्फर या घटकाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे केवळ गॅसेस कमी होतात असे नाही तर शरीराला ऊर्जा मिळण्यासही त्याचा फायदा होतो. तसेच तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय ठरु शकतो. 

आलं - आल्यामध्ये अँटी इनफ्लमेटरी घटक असल्याने सकाळी झोपेतून उठल्यावर येणारा नॉशिया किंवा मळमळ यांच्यासाठी आलं अतिशय फायदेशीर ठरते. तसेच आल्यामुळे पचनशक्ती चांगली होऊन पचनाशी निगडीत काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. तसेच आलं उष्ण असल्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही गरोदर असाल तर हा अतिशय महत्त्वाचा घटक तुम्ही आहारात घ्यायलाच हवा. 

हळद - हळदीमध्ये अँटी व्हायरल आणि अँटी सेफ्टीक गुणधर्म असतात हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळेच हळद घातलेले दूध प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गर्भवती महिलांना हाडांच्या बळकटीसाठी आणि गर्भाची वाढ चांगली होण्यासाठी दूध पिणे आवश्यक असते. त्यातच हळद घातली तर प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गरोदर असताना कोणताही आजार बळावू नये आणि तब्येत ठणठणीत राहावी असे वाटत असेल तर हळद आणि दूध आवर्जून प्यायला हवे. 

आवळा - आवळा हा भारतात सहज उपलब्ध असणारा आणि अतिशय उत्तम गुणधर्म असणारा पदार्थ आहे. नैसर्गिक डिटॉक्सिफायर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणारे आवळ्याचे फळ थंडीच्या दिवसांत सगळ्यांनीच आवर्जून खायला हवे. गरोदर असताना शरीरात लोहाची मात्रा पुरेशी असणे आवश्यक असते. तुम्ही नियमित आवळा खाल्ला तर शरीर लोह शोषून घेण्यास मदत करते. तसेच सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास आवळा उपयुक्त असतो. आवळा कँडी, मोरावळा, च्यवनप्राश, आवळा सुपारी, आवळा लोणचे असे एकाहून एक अनेक पदार्थ आपण आहारात सहज समाविष्ट करु शकतो. 


गाईचे दूध - दुधाला आपल्याकडे पूर्णान्न म्हटले जाते. दुधातील कॅल्शियम आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. बाहेरील व्हायरस आणि शरीरातील पेशी यांच्यात होणारे इंटरअॅक्शन मोडून काढण्याचे काम दुधातील लॅक्टोफेरीन हा घटक करतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच दूध प्यायला हवे. यातही हळद आणि तूप घालून दूध प्यायल्यास उत्तमच. गर्भवती महिलांनी तर आपल्या आहारात याचा आवर्जून समावेश करायला हवा.