Biodiversity - राज्याची वनस्पती जैव विविधता धोक्यात, जपणूक करणे गरजेचे

Biodiversity - राज्याची वनस्पती जैव विविधता धोक्यात, जपणूक करणे गरजेचे

Biodiversity - राज्याची वनस्पती जैव विविधता धोक्यात, जपणूक करणे गरजेचे

परिसंस्था आणि पर्यावरणीय मूल्य यामध्ये मानव जात टिकाव धरू शकावी, यासाठी आवश्यक असलेली अन्न सुरक्षा, जल पुनर्भरण, हवामानाचे संतुलन अन्न धान्य, औषध, संसाधने, ऊर्जा, तसेच  २५  टक्के  औषधेही  वनस्पतीपासून मिळतात. आपली संस्कृती, चालीरिती, उत्सव, संगीत आणि विविध कला या मध्ये जैवविविधता खोलवर प्रतिबिंबीत झालेली आहे. 

आज आपण २०२१ मध्ये आलो आहोत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने सार्‍या जगाला ग्रासले आहे. या महामारीला, समस्त मानव जातीला जैव विविधताच वाचवू शकणार आहे.  स्टेक  होल्डरसाठी  हा एक वेकअप कॉल आहे. फक्त हा एकच दिवस साजरा न करता, आपण गेल्या २५ वर्षामध्ये काय गमावले आणी काय रचनात्मक शाश्वत काम केलं, याचं चिंतन करण्याचा, विचार करण्याचा  जैव विविधतेच्या  परिसंस्था  जैव विविधता,  प्रजातीय जैव विविधता आणी जनुकीय जैव विविधता अशा तीन  पातळ्या  आहेत.  या विविध परिसंस्थेमध्ये हजारो अधिवास आणी सूक्ष्म अधिवास आहेत, जे हजारो प्रजातींना अधिवास पुरवतात.

महाराष्टातील भौगोलिक परिस्थितीमुळे, हवामानामुळे वनसंपदा विषम आणि भिन्न स्वरूपाची आहे. हे अनेक वैविध्यपूर्ण वनस्पतीनी नटलेले राज्य आहे. महाराष्ट्रातील वनस्पती संपदेचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या वेगवेगळ्या विभागामध्ये मिळून १८७ कुलातील १ हजार ८१ जातीच्या तीन हजार २५ प्रजाती सापडतात. यामध्ये लेगुम कुलातील १७६, सूर्यफुलाच्या कुलातील ५७, कारवी कुळातील ४०, कॉफी कुलातील ३८, रुई कुलातील २५, स्क्राफुलारीसी कुलातील २४, तुलसी  कुलातील  २२  वनस्पती.  गवतवर्गीय वनस्पती १०४, आणी समृद्ध जंगलाचे निर्देशांक म्हणून ओळखले जाणारे  ऑर्किड्स  कुलातील  ३४ वनस्पतीची नोंद झाली असून यामध्ये नवनवीन प्रजातीची भर पडते आहे. 

महाराष्ट्रातील एकदंर वनस्पतीचा विचार केला तर या दहा कुलांचेच वर्चस्व आहे.  यामध्ये अल्गी, फंगी, नेचेवर्गीय,गवतवर्गीय याही वनस्पती येतात. ह्यांची जैव विविधततेमध्ये महत्वाची भूमिका आहे हे आपण विसरून चालणार नाही. आजमितीला अंदाजे २५ जाती आणी ६९४ प्रजाती या भारतात सापडत असलेल्या प्रदेशांनिष्ठ वनस्पती असून त्या पैकी आठ जाती आणि १५७ प्रजाती महाराष्टात आहेत. 


आपण जे अन्न खातो यापैकी ८० टक्केपेक्षा जास्त वनस्पती या गवतवर्गीय आहेत.पण दुर्दैवाने गवताळ भूप्रदेशांना आपण पडीक, दुर्लक्षित जमीन समजतो. पण या पडजमिनीवर वैशीष्टपूर्ण वनस्पतीची विविधता आढळून येते. याच जमिनीवर गवताचे निर्मुलन करुन मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात येत आहे. ही बाब चिंताजनक आहे.  नुकतीच जैव विविधतेने समृद्ध आंबोलीमध्ये इचामम अंबोलिलेंसिस ही गवताची नवीन प्रजात सारंग बोकिल, मंदार दातार, रितेश कुमार चौधरी व शुभदा ताम्हनकर यांनी शोधून काढली ही गौरवाची बाब आहे. 

गवताळ परिसंस्था एक खास परिसंस्था असते. जैव विविधतेमध्ये विविध खाण्यायोग्य वनस्पती भाजीपाला कडधान्ये, वेलवर्गीय याचाही समावेश होतो. पारंपरिक वाणाचा प्रचार, प्रसार आणि वितरण मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून बहुराष्ट्रीय कंपन्यातून हायब्रीड बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचा परिणाम पारंपारिक बी बियाणे जसे भाताची गावठी वाणे, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी यांची जुनी वाणे झपाट्याने ऱ्हास पावत आहेत, ही खूपच गंभीर बाब आहे. 

या शिवाय गावठी रायवळ आंब्यामध्ये त्याच्या चव, रंग, वास आकार या नुसार वैशीष्टपूर्ण विविधता सापडते, रानमेवा प्रकारात जांभुळ, करवंद, फणस यामध्येपण खूप विविधता आहे. शाश्वत जैव विविधता संवर्धनासाठी या विविध गावठी वाणांच्या बीज संकलन ते रोपवाटिका निर्माण करणे ही एक चळवळ बनली पाहिजे तसेच गावठी काशी भोपळा, पारंपारिक वाणे या मध्ये गावरान भेंडी वांगी, टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय गावठी पडवळ, दोडका, गिलका, काकडी वालाची विविध वाणे, पोकळा, लाल माठ, ह्या भाज्या तसेच कंदभाज्या,रानभाज्या जसे करजकंद, बडगा, कवदर, पाचुट, चंदनबटवा, कोहिरी,काळी अळू , चीचुडी हे सर्व स्थानिक वाण रोग आणी किडींना प्रतिकार करणारे आहेत, तसेच खाण्यासाठी रुचकर व पौष्टीक आहेत ह्याच्या बिया/कंद या पिक वाण व भाजीपाल्यांची विविधता कमी कमी होत आहे.

 याकामी अहमदनगर जिल्हयातील महिलांनी खास करुन ममताबाई भांगरे,शांताबाई धांडे,राहीबाई पोपरे यांनी गावरान वाणांचे परंपरेने जतन संवर्धन केले आहे व ही जैव विविधता अबाधित ठेवण्यासाठी विशेष परिश्रम केले आहेत.हे काम उल्लेखनीय व कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. बाएफ या संस्थेने याकामी पुढाकार घेऊन अकोले तालुक्यातील आदिवासी महिलांना संघटीत व प्रोसाहित केले आहे. या विविध गावठी वाणांच्या बियांचा प्रचार प्रसार व वितरण व्यापक प्रमाणात झाले पाहिजे.

भारताचा विचार केला तर पूर्व हिमालय व पश्चिम घाट हे दोन जैव विविधतेने समृद्ध हॉट स्पॉट आहेत. उच्च प्रतीची प्रदेशानीष्टता, नवीन प्रजातीचा शोध, आणि मानवी हस्तक्षेप या मुळे हे दोन भाग अतिसंवेदनशील आहेत यापैकी अरबी समुद्राला समांतर डोंगर रांगांना आपण पश्चिम घाट संबोधतो. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू  व केरळ या सहा राज्यांचा समावेश होतो तर पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील पर्वत रांगांना आपण सह्याद्री असे म्हणतो. यामध्ये नाशिक,नगर,धुळे,नंदुरबार,ठाणे, रायगड सांगली, सातारा, कोल्हपुर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्याचा समावेश होतो. या ठिकाणी कंदीलपुष्प (शिरोपेजीया ) या दुर्मिळ संकटग्रस्त वेलवर्गीय वनस्पतीची कमालीची विविधता आढळून येते. फ्रेरीया इंडिका ही दुर्मिळ वनस्पती ही सह्यादीत सापडते. 

खंड विभाजनमुळे जी वैशिष्ट्यपूर्ण पठारे निर्माण झाली, ही अति उंचीवर असून या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असते. जोराने वाहणारे वारे, अल्प प्रमाणात असणारा मातीचा थर या अल्पजीवी व पावसाळ्यातच येणाऱ्या अल्पायुषी क्षुपे या ठिकाणी आढळून येतात. यामध्ये इरीओकोलन, स्मिथीया, कंदीलपुष्प, युट्रीकुलीरिया, बाल्सम या प्रजातीमध्ये कमालीची विविधता आढळून येते. 

दक्षिण पश्चिम घाटातील सातारा, सांगलीचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वनस्पतींची विविधता पण कमी आहे. महाराष्ट्र तसेच विदर्भ, खानदेश या ठिकाणीदेखील पावसाचे प्रमाण खूप कमी आहे.त्याचा परिणाम शेतीवर, आर्थिक, सामाजिक जीवनावर होत आहे, याला तेथील भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.

शेतीमधील बदललेली पिक पद्धती व गेल्या २० वर्षात पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे, यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी देखील झपाट्याने खालावत चालली आहे.यासाठी वॉटर शेड मॅनेजमेंटबरोबरच व्यापक प्रमाणात सुसंगत झाडे देशी लावणे व जैव विविधतेची जपणूक करणे, जनजागृती करणे ,लोकसहभाग वाढविणे या गोष्टी आत्यंतिक महत्वाच्या आहेत. 

सह्यादी ही प्राचीन पर्वत रांग प्रणाली असून सह्यादीतून अनेक नद्याचा उगम झालाय. त्यांमुळे येथील धरणे भरतात. शेती, विद्युत प्रकल्प तसेच आर्थिक, सामजिक जीवनमानात सह्यादीचे स्थान खूप महत्वाचे असून भारतीय अर्थव्यवस्थेचा नियोंता नैऋत्य मोसमी पाउस अडविण्याचे महत्वाचे काम सह्याद्री करतो. सह्यादी मध्ये अनेक दुर्मिळ संकटग्रस्त औषधी वनस्पती तसेच जैवविविधत्तेने समृद्ध देवराया आढळून  येंतात  पण  खूपशा  देवराया  या विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत. या ठिकाणी अनेक प्रदेशानिष्ठ , दुर्मिळ, संकटग्रस्त, तसेच औषधी वनस्पती सापडतात. 

 महाराष्ट्र राज्याचा विचार करता देवराया या घाटमाथा, तळकोकण व घाटाच्या पूर्वेकडील उताराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आहेत. आजकालचा परवलीचा शब्द म्हणजे जैव विविधता ह्याचे विविध पैलू इथे पहावयास मिळतात देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते, देवराई ही औषधी, दुर्मिळ, संकटग्रस्त वनस्पतीचे  आश्रयस्थान  असते.  देवराईतील झाडे ही तेथील जमिनीवर छत्र तयार करतात, त्यामुळे पावसाचा मारा भूभागावर प्रत्यक्षपणे होत नाही.  झाडाच्या माथ्यावरून पाणी हळूहळू खाली येते.

जमिनीवरील पालापाचोळ्यावरून पृष्ठभागाखाली झिरपते, मग हेच पाणी नजीकच्या वाड्या वस्तीतील, गावातील विहिरी, तलाव, शेततळी यामधील पाणी साठा वाढविण्यास मदत करते. पाणी संवर्धनासाठी झाडे, जैव विविधता व वनस्पतीशास्त्राचा व्यवहार्य व डोळस पणे अभ्यास करणे ही खरी गरज आहे. 

सर्वसाधारणपणे सर्वच मोठ्या झाडांची मुळे जमिनीखाली खोलवर जाण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्याच बरोबर स्वतःची जाडी वाढवितात. या मुख्य मुळाचे काम पाणी साठविण्यासाठीचे असते त्याला  उपमुळे फुटून ते पाणी शोषुन घेतात. ही मुळे जमिनीत खोलवर गेल्यावर जमीन भुसभुशीत करतात, त्यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. याप्रकारे जल, जमीन व जंगल यांचे परस्पर नाते आहे. हे आपण विसरून चालणार नाही. 

राष्टीय वननीती धोरणानुसार आपल्या देशामध्ये ३३% जंगल क्षेत्र असणे आवश्यक आहे. पण एकूण उपलब्ध जमीन, लोकसंख्या व जंगलक्षेत्र पहाता उपग्रहाद्वारे घेतलेल्या इमेजेस पाहता हे क्षेत्र अवघे १४ % आहे. नैसर्गिकरित्या जंगल निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आज मानवी हस्तक्षेपामुळे वनस्पती जैव विविधता ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो आहे. पुढील बाबी याकरिता कारणीभूत आहेत.

जमिनीचा वापर पद्धती, अशाश्वत खाणकाम, बेलगामपणे चालत असलेले पर्यटन, वनवा, रस्ते, लोहमार्ग, अधिवास आकुंचन, वाढते उद्योगीकरण, अशाश्वत शहरी विकास आणि बाहेरून आलेल्या तणांचा वाढता प्रादुर्भाव, एकसुरी झाडांची लागवड व धोरण ठरवणारे हायब्रीड वाणांचाच शेतीसाठी पुरस्कार करतात. त्यामुळे हायब्रीड भाजीपाला, फळभाज्या सुशोभीकरणासाठी परदेशी झाडांचीच मोठ्या प्रमाणात लागवड यामुळेही वनस्पती जैव विविधता धोक्यात आली आहे. 

या पार्श्वभूमीवर आघारकर इन्स्टिट्यूट, आयसर, सह्यादीतील दुर्मिळ आणि संकटग्रस्त वनस्पतीची जतन संवर्धन याकामी शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र विभागाचे अग्रणी जैव विविधता उद्यान, बायफ संस्था पर्यावरण शिक्षणाच्या अनुषंगाने जैव विविधता शिक्षण देणारी पर्यावरण शिक्षण केंद्र ( सीईई ) व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

या शिवाय वनविभाग महाराष्ट शासना तर्फे विविध जिल्हयाच्या जैव विविधता उद्यानांची निर्मिती केली जात आहे.ज्यातून भविष्यातील सीड बँक म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो . ज्या मध्ये विविध स्थानिक वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. 

संवेद्नशील सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्रि देवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  महाराष्ट्रातील १३ विविध जिल्हयामधून ३३ विविध ठिकाणी लहान मोठ्या देवराया उभ्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने देशी झाडाची जाणीवपूर्वक लागवड करण्यात येत असून स्थंनिकाच्या सहभागातून त्याचे जतन संवर्धन केले जात आहे. २.५ लाखावर ९० पेक्ष्या जास्त स्थानिक प्रजाती लावून जैव विविधता जोपासली जात आहे.

वनस्पती हा मानवी जीवनाचा मूलाधार आहेत. वैश्विक तापमान वाढ, वातावरण बदल या जागतिक समस्या मानवी हस्तक्षेपामुळे, हव्यासामुळे निर्माण झाल्या आहेत. वनस्पतीची विविधताच आपणाला यातून तारणार आहे. हे आपण सदैव ध्यानात घेतले पाहिजे. पाण्याचे वितरण, हवामान, आपण जे आहारात घेतो त्याचे सर्व जंगली भाईबंद 
( वाईल्ड रिलेटीव्ह ) औषधी वनस्पतीची विविधता लाकूड, वॉटर शेड, अद्वितीय मायरीस्तिका स्वाप्स, नदीकाठची परिसंस्थाजलीय वनस्पती, पठारे, डिंक, रेझिन, मायनर प्राडकटसं हे सर्व वनस्पती जैव विविधतेतून आपणाला प्राप्त होतात.

हजारो कीटक, पक्षी, प्राणी यांचा पोशिंदा वनस्पतीची जैव विविधता आहे. जैवविविधता बाबत आपण जगात सातव्या क्रमाकांवर आहोत ही गौरवशाली बाब आहे, पण कमी होत जाणारे, घटणारे जंगलक्षेत्र वाचविणे व आहे ती वनस्पती विविधता अबाधित ठेवणे या बाबी महत्वाच्या आहेत. या साठी संकल्प आणि निर्धार त्याचबरोबर लोकसहभागाची गरज आहे.  भविष्यातील आपल्या अन्नातील विविधता टिकवायची असेल तर आपली ही अनमोल वनसंपदा टिकविणे गरजेचे आहे.

-सुहास मारुतराव वायंगणकर
सदस्य, महाराष्ट वन्य जीव महामंडळ,
कोल्हापूर.