नेत्ररोगांवर वेळेत उपचार घेतल्यास अंधत्व टाळता येते नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक दृष्टीदान दिन साजरा

नेत्ररोगांवर वेळेत उपचार घेतल्यास अंधत्व टाळता येते नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक दृष्टीदान दिन साजरा

नेत्ररोगांवर वेळेत उपचार घेतल्यास अंधत्व टाळता येते  नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक दृष्टीदान दिन साजरा

लातूर, दि. 11 – मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा, दृष्टीदोष, मधुमेह या डोळ्यांच्या आजारांमुळे व कुपोषण, अ जिवनसत्वाचा अभाव, चष्मा न वापरणे, डोळ्याला मार लागणे या कारणामुळे अकाली अंधत्व येण्याची शक्यता असते. मात्र डोळ्यांचे आजार व दृष्टीदोषाचे निदान करुन वेळेत उपचार घेतल्यास येणाऱ्या अंधत्वाला टाळता येते, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी केले.

येथील माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील नेत्ररोग विभाग आणि महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त शुक्रवार, दि. 10 जून रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. हनुमंत कराड बोलत होते. यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, प्रशासकीय आणि शैक्षणिक संचालीका डॉ. सरिता मंत्री, वैद्यकीय अधिक्षक तथा महिला आरोग्य आणि कुटूंब कल्याण समन्वयक डॉ. वर्षा सौरभ कराड, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. नृसिंह कुलकर्णी, नर्सिंग अधिक्षक एस्तर जोसफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, डोळा हा अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. वयोमानानुसार डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. बालपण, तरुण्य, प्रोढावस्था व महातारपण या काळात वयानुसार डोळ्यांचे आजार उद्भवत असतात. त्या-त्या वेळी डोळ्यांच्या आजारांवर नेत्र तज्ज्ञांकडून तपासणी करुन उपचार घेतल्यास दृष्टी चांगली राहते. मोतीबिंदू या आजारावर शस्त्रक्रिया करुन दृष्टी कायम ठेवता येते तर काचबिंदू या आजाराचे वेळेत निदान करुन त्यावर नियमित उपचार घेणे आवश्यक आहे. निरळेपणावर या आजारावरही उपचार अथवा शस्त्रक्रिया करुन दृष्टी सरळ करता येते. मधुमेही व्यक्तीने नेत्र तज्ज्ञांच्या संपर्कात राहून उपचार घेणे आवश्यक आहेत तर जवळचे अथवा लांबचे कमी दिसत असल्यास डोळ्यांची तपासणी करुन घेवून नियमित चष्मा वापरणे गरजेचे आहे. तसेच डोळ्यांसाठी अ जिवनसत्वाची आवश्यकता असून रोजच्या आजारात पालेभाज्या, फळे यासह पोषक आहार घ्यावा असे डॉ. कराड यांनी सांगीतले.      

यावेळी बोलताना डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, दृष्टी शिवाय बाह्य जीवनाची कल्पना होऊ शकत नाही. त्यामुळे दृष्टी ही प्रत्येकासाठी महत्त्वाची असून दृष्टी दिर्घकाळ टिकण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. समाजातील नेत्रहिनांना दृष्टी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी अधिक प्रमाणात नेत्रदान होणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेवून दृष्टी दानाचा संकल्प करावा. जेणेकरुन समाजातील नागरीकांना दृष्टीदानाविषयी अधिकाराने सांगता येईल, असे डॉ. जमादार म्हणाले.

यावेळी दृष्टीदान याविषयी महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर सादर केले. प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. समृध्दी मोरे यांनी दृष्टीदान दिनाविषयी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील विद्यार्थी अमृता जाधव व सुजाता घाडगे यांनी दृष्टीदान या विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. शैला बांगड, डॉ. दिनकर काळे, डॉ. बस्वराज वारद, डॉ. पारितोष ठाकुर, डॉ. मोहम्मद सय्यद, प्रशासकीय अधिकारी शंकर ससाने, सतर्कता अधिकारी सतीश बाबळसुरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उमेश राठोड यांनी केले तर आभार डॉ. प्रथमेश व्यास यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैभवी चुरी, डॉ. प्रियंका पटेल, डॉ. मिसबाह शेख, लिपीक राधा चाटे, रोहिनी बुरांडे, नेत्र तंत्रज्ञ सुप्रिया उरगुंडे, सेवक मोहन सिरसाट, राजेंद्र शिंदे, रफिक शेख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय आणि महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील डॉक्टर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व रुग्ण उपस्थित होते.