बारावीनंतर आवड, क्षमता आणि ध्येय जाणूनच करिअरची निवड करा प्रा. तेजस कराड यांचे आवाहन; लातूर एमआयटीत करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न
बारावीनंतर आवड, क्षमता आणि ध्येय जाणूनच करिअरची निवड करा प्रा. तेजस कराड यांचे आवाहन; लातूर एमआयटीत करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न
२१ व्या शतकाच्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये एकाच पदवीवर करिअर उभे राहण्याचे दिवस संपले असून सतत शिकणे, कौशल्यवृद्धी आणि स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन योग्य करिअरची निवड करावी, असे आवाहन माईर एमआयटी लातूरचे संचालक प्रा. तेजस हनुमंत कराड यांनी केले.

येथील माईर एमआयटी, लातूरच्या करिअर गाईडन्स सेलतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात प्रा. तेजस कराड प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. यतिश कुमार जोशी, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, ऑप्टोमेट्री महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. शंकर ससाने, तसेच प्रयाग कराड कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीमती आशा फुंदे उपस्थित होत्या.
यावेळी पुढे बोलताना प्रा. तेजस कराड यांनी तैत्तिरीय उपनिषदातील ‘स्वाध्यायान्मा प्रमदः’ या वचनाचा उल्लेख करत स्व-अभ्यास आणि सतत शिकण्याच्या संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. आजची शिक्षणपद्धती गुणांपुरती मर्यादित झाल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांना प्रश्न केला, आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय की फक्त गुण मिळवायला तयार करत आहोत? विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी टाळून व्याख्यात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी केवळ एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंगपुरत्याच मर्यादित न ठेवता उदयोन्मुख क्षेत्रांची माहिती देणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची वाढती मागणी असल्याचे सांगत त्यांनी दंत चिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑप्टोमेट्री, हॉस्पिटल मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च यांसारख्या शिक्षणातील करिअर संधींकडे लक्ष वेधले वेधले.
अनेक विद्यार्थ्यांना — मी कोण? मला काय जमतं? आणि मी हे का करतोय? यांची स्पष्टता नसल्याने त्यांच्यातील तणाव आणि असंतोष वाढतो. विद्यार्थ्यांना स्वतःचा मार्ग शोधण्यास सक्षम करणे ही सर्वांची सामाईक जबाबदारी आहे. कौशल्याधारित शिक्षण, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, एआय आणि डिजिटल साक्षरता या नव्या युगातील आवश्यक गरजा असल्याचे प्रा. कराड यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. यतिश कुमार जोशी यांनी दंत वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णोपचारातील वाढत्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. सुभाष खत्री यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील शिक्षण, उपचारातील उपयोगिता व करिअरच्या व्यापक संधींची माहिती दिली. एमआयटी करिअर गाईडन्स सेल प्रमुख श्री. बळीराम हांडगे यांनी वैद्यकीय व पॅरामेडिकल क्षेत्रामधील विविध करिअर पर्याया बाबत सखोल माहिती दिली.
श्रीमती आशा फुंदे यांनी नर्सिंग क्षेत्रातील जागतिक मागणी, नोकरीच्या संधी यावर प्रकाश टाकला. श्री. शंकर ससाने यांनी ऑप्टोमेट्रीमधील शिक्षण, नोकरी आणि स्वतंत्र व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. मानसोपचार तज्ज्ञ श्री. संदेश नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, ताण-तणाव व्यवस्थापन आणि योग्य मनःस्थिती राखण्याचे गुपित सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर सोनवणे यांनी केले, तर आभार श्रीमती राधा चाटे यांनी मानले. लातूर जिल्ह्यातील सुमारे ६० महाविद्यालयांमधील प्राचार्य व प्राध्यापकांनी या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी हनुमंत नलवाडे, वर्षा ढाकणे, धनंजय कुलर्णी, गोविंद फड, नय्युम शेख, नामदेव घोडके, बालासाहेब सरवदे व कृष्णा केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

