इलेक्ट्रोथेरपी ही आधुनिक फिजिओथेरपीतील प्रभावी व सुरक्षित उपचार पध्दती डॉ. वाय. प्रविण कुमार;‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे लातुरात भव्य उद्घाटन

इलेक्ट्रोथेरपी ही आधुनिक फिजिओथेरपीतील प्रभावी व सुरक्षित उपचार पध्दती डॉ. वाय. प्रविण कुमार;‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे लातुरात भव्य उद्घाटन

इलेक्ट्रोथेरपी ही आधुनिक फिजिओथेरपीतील प्रभावी व सुरक्षित उपचार पध्दती डॉ. वाय. प्रविण कुमार;‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे लातुरात भव्य उद्घाटन

लातूर – आधुनिक फिजिओथेरपीमध्ये ‘इलेक्ट्रोथेरपी’ ही एक अत्यंत प्रभावी, वैज्ञानिक आणि सुरक्षित उपचार पद्धती असून ती वेदना नियंत्रण, स्नायूंचे पुनरुज्जीवन, रक्तप्रवाह सुधारणा आणि ऊतकांची पुनर्बांधणी यासाठी उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अलाईड हेल्थ सायन्सचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रविण कुमार यांनी केले.

एमआयटी लातूर येथील संत ज्ञानेश्वर डोममध्ये आयोजित ‘इलेक्ट्रोकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही परिषद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिलिपिन्सचे डॉ. ख्रिश्चियन रे डी रिमांडो, डॉ. वॉरीन क्रित्यकिआराना व डॉ. विरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, डॉ. सिंगारावेल्लन यांची उपस्थिती होती.

डॉ. वाय. प्रविण कुमार पुढे म्हणाले की, आजाराच्या अचूक निदानानंतर आणि प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट च्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रोथेरपी दिल्यास ती शस्त्रक्रियेनंतर, इजा झाल्यावर, पक्षाघातानंतर, तसेच दीर्घकालीन वेदनांमध्ये (जसे आर्थ्रायटिस, लो बॅक पेन) प्रभावी ठरते. टेन्स, फॅराडिक करंट, आएएफटी, अल्ट्रासाऊंड, लेझर थेरपी अशा आधुनिक उपकरणांचा वापर यामध्ये केला जातो.

फिलिपिन्सचे डॉ. डी रिमांडो यांनी सांगितले की, त्यांच्या देशातील क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये इलेक्ट्रोथेरपी ही वेदना व्यवस्थापन आणि न्यूरोमस्क्युलर पुनःशिक्षणाचा मुख्य आधार आहे. तांत्रिक नवकल्पनांच्या स्वीकारामुळे या उपचारपध्दतीत सातत्याने सुधारणा होत आहेत.

तर डॉ. वॉरीन क्रित्यकिआराना यांनी थेरपीटिक अल्ट्रासाऊंडच्या बायोफिजिकल तत्त्वांवर आधारित उपचारपध्दतीचे महत्त्व अधोरेखित केले.

परिषदेच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. हनुमंत कराड यांनी लातूरमध्ये होणारी ही राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद असल्याचा अभिमान व्यक्त करत देश-विदेशातील फिजिओथेरपीस्ट, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी केले.

सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा लंके व डॉ. अनिल साठे यांनी केले, तर आभार डॉ. सिंगारावेल्लन यांनी मानले. या परिषदेतील प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. तारपन शहा, डॉ. आशीश कक्कड, डॉ. इशा तजानी, डॉ. ध्रुव दवे, डॉ. वेणु मोहन, डॉ. विजय पंडिता, डॉ. आकांशा जोशी, डॉ. परविन पठाण, डॉ. जय गुप्ता, डॉ. वैभव महाजन, डॉ. अस्मिता मोहरकर, डॉ. ममता शेट्टी, डॉ. रमनदिप कौर, डॉ. रिमा जोशी, डॉ. श्रुतीका परब, डॉ. रुपम सरकार, डॉ. त्रिवेनी शेट्टी, डॉ. आभा खिस्ती, डॉ. निलिता शेठ, डॉ. वैभव डोळस, डॉ. स्नेहा नरलवर, डॉ. शेफाली बोधना, डॉ. कोमल ब्रम्हभट्ट, डॉ. निधी पांड्, डॉ. पुजा आचार्य यांचा समावेश होता. याशिवाय देश-विदेशातील फिजिओथेरपी तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राध्यापक व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.