जागतिक मौखिक आरोग्य दिन
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या वतीने भातांगळी येथे 350 रुग्णांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी
लातूर – येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील सार्वजनिक दंत आरोग्य विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त लातूर तालुक्यातील भातांगळी येथे मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 350 रुग्णांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मौखिक आरोग्य दिनानिमित्त भातांगळी गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
या आरोग्य शिबिरास एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील सार्वजनिक दंत आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. भागवत केंद्रे, डॉ. विलास धुमाळ, पं. स. सदस्य पांडूरंग बालवाड, भातांगळीचे सरपंच परमेश्वर पाटील, उप सरपंच मारुती शिंदे, चेअरमन व्यंकटराव जटाळ, लिंबराज बोळंगे, विठ्ठल बोजे, डिगंबर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील लोकांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या मौखिक आरोग्य तपासणी शिबिरात दंत रोग तज्ज्ञांकडून रुग्णांची मुख व दंत रोग, मुख कर्करोग, तोंडात उद्भवणारे पांढरे – लाल चट्टे, हिरड्या व त्यासबंधी आजार अशा 350 रुग्णांची तपासणी करुन आजाराचे योग्य निदान करण्यात आले. दिर्घ आजाराच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात पाठविण्यात आले. या दंतरोग शिबिरात डॉ. भागवत केंद्रे, डॉ. विलास धुमाळ, डॉ. महिमा हरियानी, डॉ. स्नेहा होपळे, डॉ. नितीन जाधव, डॉ. शिवानी तडवळकर, डॉ. पवन जाधव, डॉ. प्रियांजली जाधव, डॉ. प्रियंका जाधव यांनी सेवा बजावली.
यावेळी बोलताना डॉ. अश्विनी बिरादार म्हणाल्या की, निरोगी मुख हे संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी मदत करते. निरोगी मुखासाठी दररोज सकाळी, झोपण्यापुर्वी योग्य पध्दतीने दात व हिरड्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासोबत वर्षातून दोन वेळा दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी व मुखरोग उद्भवल्यास त्वरीत उपचार घ्यावेत. तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भागवत केंद्रे यांनी दंत रचना, हिरड्यांचे आरोग्य व त्यावरील विविध उपचार पध्दती या विषयी माहिती दिली. डॉ. पवन जाधव यांनी मौखिक आरोग्य दिना विषयी व दातांचे आरोग्य, दातांचा संच, दंत उपचार पध्दती या बाबत पीपीटीच्या माध्यमातून माहिती दिली.
या वेळी मौखिक आरोग्य दिनानिमित्त भातांगळी गावात रॅली काढून मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील विद्यार्थी, जिल्हा परिषद भातांगळी येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास धुमाळ यांनी केले तर आभार उप सरपंच मारोती शिंदे यांनी मानले.