परिचारिका ही रुग्ण सेवेची खरी जननी - डॉ. अमोल डोईफोडे; जागतिक परिचारिका दिनानिमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात कृतज्ञता सोहळा
लातूर - प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांना सहानुभूती आणि सेवाभावाने मदत करणारी पहिली व्यक्ती म्हणजे परिचारिका. त्या केवळ शारीरिक उपचारच नाही, तर रुग्णांना मानसिक आधार देखील देतात. त्यामुळे रुग्ण सेवेची खरी जननी ही परिचारिकाच आहे, असे प्रतिपादन प्रभारी उप प्राचार्य डॉ. अमोल डोईफोडे यांनी केले.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे परिचारिकांचा कृतज्ञता सत्कार सोहळा घेण्यात आला. या प्रसंगी डॉ. अमोल डोईफोडे बोलत होते. यावेळी मुख्य लेखा अधिकारी सुनील कवठेकर, प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब सुर्यवंशी, परिचारिका पर्यवेक्षक संतोष मसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सर्व परिचारिकांचा सत्कार करून त्यांच्या रुग्ण सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मानसिक, शारीरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या एकरूप होऊन रुग्ण सेवा देण्याचे काम परिचारिका सातत्याने करतात. रुग्णसेवेच्या व्यस्ततेत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असल्याने, परिचारिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. अमोल डोईफोडे म्हणाले की, परिचारिका केवळ उपचाराची पूर्तता करत नाहीत, तर त्या रुग्णाचे मनोबलही वाढवतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून त्या निस्वार्थपणे कार्य करतात. रुग्णांच्या वेदनांमध्ये आधार देणाऱ्या, औषधोपचारांबरोबरच मानसिक आधार देणाऱ्या आणि संकटसमयी रात्रंदिवस न थकता सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या कार्याला उतराई होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे डॉक्टर डोईफोडे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्री सुनील कवठेकर म्हणाले की, परिचारिकांनी त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळून रुग्णसेवा करावी. श्री संतोष मसुरे यांनी भारतीय सैन्यात दिलेल्या रुग्ण सेवेबाबत उपस्थितांना माहिती दिली. मानसशास्त्रज्ञ श्री संदेश नागरगोजे यांनी परिचारिकांना मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
जन्म आणि मृत्यू अशा दोन्ही वेळी सोबत असणारी व्यक्ती म्हणजे परिचारीका. परिचारीका ही स्वताचे दु:ख विसरुन आईच्या भूमीकेतून रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी काम करते, असे परिचारिका राणी फुंदे यांनी सांगीतले तर रुग्णाच्या वेदनेवर मायेची फुंकर घालण्याचे काम परिचारीका करते असे योजना अमुगे आपल्या मनोगतात म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल ज्ञानोबा केंद्रे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

