ओआरएस, झिंक हा जुलाब, उलटीवर प्रभावी उपचार डॉ. एन. पी. जमादार; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक ओआरएस दिन साजरा
लातूर – जुलाब, उलटीव्दारे शरीरातील पाणी व क्षार मोठ्या प्रमाणात बाहेर पडून अशक्तपणा वाढतो. अशा स्थितीत शरीरातील पाणी - क्षार यांची हानी भरून काढण्यासाठी मिठ, साखर, पाणी ही जलसंजीवनी अथवा ओआरएस आणि झिंक यांचे सेवन हा जुलाब, उलटीवर प्रभावी उपचार आहे. बाळास ओआरएस अथवा जलसंजीवनी पाजल्यास जुलाब, उलटी थांबते व मृत्यूपासून बचाव होतो, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी केले.
येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वतीने जागतिक ओआरएस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. एन. पी. जमादार बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. एच. मिश्रा, बालरोग विभाग प्रमख डॉ. विद्या कांदे, बालरोग तज्ञ डॉ. महेश सोनार, डॉ. शिल्पा दडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, दूषीत पाणी, अस्वक्षता आणि खेळताना अजानतेपणाने बाळाच्या पोटात जीवाणू व विषाणू प्रवेश करतात. त्यामुळे बाळास जुलाब, उलटी होऊन शारीरातील पाणी व क्षार बाहेर पडत असतात. अशा परिस्थितीत आजाराकडे दुर्लक्ष न करता बाळास स्वच्छ पाण्यात तात्काळ ओआरएसचे पावडर मिसळून पाजावे व डॉक्टरांच्या सल्याने झिंकची गोळी द्यावी. ओआरएस उपलब्ध होत नसल्यास घरातील मिठ, साखर व पाणी यांचे मिश्रण करुन ते बाळास पाजावे. हे उपचार बाळास रुग्णालयात नेईपर्यंत द्यावेत. जेणेकरुन बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहील. जुलाब, उलटी झाल्यास प्रोढ व्यक्तीही हा उपचार घेवू शकतात, असे डॉ. जमादार यांनी सांगीतले.
डॉ. पी. एच. मिश्रा म्हणाले की, जुलाब अथवा अन्या कारणाने अचानक शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बालक दगावू शकते. त्यामुळे बाळास आवश्यक त्या प्रमाणात पाणी पाजावे व स्वच्छता राखून अन्न शिजवून द्यावे.
डॉ. विद्या कांदे म्हणाल्या की, लहान मुलांना जंतुसंक्रमनामुळे जुलाब हा आजार होतो. जगभरात पाच वर्षाखालील मुलांचे जुलाबामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे दुसऱ्या स्थानी आहे. मात्र लहान मुलांना जुलाब, उलटी झाल्यानंतर वेळेत जोडी नं. 1 अर्थात ओआरएस व झिंक दिल्यास 93 टक्के एवढ्या प्रमाणात बालमृत्यू टाळता येतात.
डॉ. महेश सोनार म्हणाले की, बाळाने दात काढल्यामुळे जुलाब होतो हा समज चुकीचा असून व्हायरस पोटात गेल्याने जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी ओआरएस दिल्यास बाळास सलाईन लावण्याची गरज भासणार नाही. त्यासोबत झिंक दिल्यास पुढील अडीच तीन महिने जुलाबापासून संरक्षण होते.
यावेळी डॉ. अखिलेश अंजान यांनी जागतिक ओआरएस दिनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निखील नंदवाणी यांनी केले तर आभार अभिषेक जैन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिल्पा दडगे, डॉ. सोनल रे, डॉ. व्यंकटेश माहुरे, डॉ. अपर्णा आस्था, डॉ. स्नेहल सोनकांबळे, डॉ. दिपीका माशाळक, परिचारीका शाकिरा हिप्परगे, कविता येरमाळे, लिपीक किरण साबळे, सेवक सुग्रीव केंद्रे यांनी परिश्रम घेतले.