तंदुरुस्त राहण्यासाठी योगाला जीवनपद्धती बनवा डॉ. हनुमंत कराड यांचे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन साजरा
तंदुरुस्त राहण्यासाठी योगाला जीवनपद्धती बनवा डॉ. हनुमंत कराड यांचे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन साजरा
लातूर – सध्याच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. नियमितपणे योग अभ्यास केल्याने शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. शिवाय योग विद्येचा जीवनपध्दतीत समावेश केल्यास आयुष्यभर तंदुरुस्त आणि निरोगी राहता येईल, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी केले.
येथील माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. हनुमंत कराड बोलत होते. यावेळी प्रमुख योग प्रशिक्षक डॉ. विमल होळंबे-डोळे, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उप अधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणिक संचालीका डॉ. सरिता मंत्री, प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, प्राचार्य सरवनन सेना, प्राचार्य डॉ. पल्लवी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, योगविद्या ही भारताने संपूर्ण मानवजातीसाठी दिलेली मोठी देण आहे. योगविद्येचे पुर्ण श्रेय हे आपल्या ऋषीमुनींना जाते. मनुष्य जीवनात शरीरसंपत्ती ही इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. आपले शरीर निरोगी आणि मन प्रसन्न असेल तर जगण्यातील आनंद द्विगुणित होतो. शरीराचे आरोग्य हे आपली जीवनशैली आणि सवयींवर अवलंबून असते. सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, योग, प्राणायाम यासारख्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात आणि त्यांचा सातत्याने अभ्यास करावा. दररोज काही वेळ काढून व्यायाम केल्याने दैनंदिन कार्यक्षमतेत वाढ होते व तान-तनावापासून दूर राहता येते, असे डॉ. कराड यांनी सांगीतले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार व उप अधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्त्व विषद केले तर योग प्रशिक्षक डॉ. विमल होळंबे – डोळे यांनी योग, प्राणायाम या विषयी माहिती सांगून उपस्थितांकडून ताडासन, वृक्षासन, विमानासन, त्रिकोनासन, मर्कटासन, सर्वांगासन, हलासन, चक्रासन, भुजंगासन, नवकासन, धनुरासन यासह भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरीका व ओमकार हे प्राणायाम करुन घेतले.
या प्रसंगी मानवतेसाठी योग या विषयावर एम.बी.बी.एस. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य शपथ देण्यात आली. तसेच जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मानवतेसाठी योग या विषयावर पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनात एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्ट्र सादर केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवांग कुलकर्णी व जान्हवी अय्यर यांनी केले तर आभार प्रजय गिरी यांनी मानले. कार्यक्रमास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.