पृथ्वी निरोगी असेल तर आपण निरोगी राहू डॉ. शितल पाटील; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

पृथ्वी निरोगी असेल तर आपण निरोगी राहू डॉ. शितल पाटील; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

पृथ्वी निरोगी असेल तर आपण निरोगी राहू  डॉ. शितल पाटील; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

लातूर - सध्या स्थितीत वातावरणातील हवा, पाणी आणि अन्न दूषित झाल्याने मनुष्याला विविध प्रकारच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपला गृह अर्थात पृथ्वीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पृथ्वीचे आरोग्य चांगले असेल तर हवा, पाणी आणि अन्न स्वच्छ मिळेल आणि आपले आरोग्य निरोगी राहिल, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक तथा छातीविकार तज्ज्ञ डॉ. शितल पाटील यांनी केले.

येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील सामाजिक औषध शास्त्र विभाग येथे जागतिक आरोग्य दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ‘आपला गृह – आपले आरोग्य’ या विषयावर डॉ. शितल पाटील बोलत होते. प्रारंभी ‘आपला गृह – आपले आरोग्य’ या विषयावरील पोस्टरचे उद्घाटन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, सामाजिक औषध शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मुकूंद भिसे, रायचूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राहुल किर्ते, सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संपत तोडकर, डॉ. अनंत टाकळकर, डॉ. सुनिल सगरे, डॉ. भास्कर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. शितल पाटील म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी 13 लाखापेक्षा अधिक मृत्यू टाळता येईल अशा पर्यावरणीय कारणांमुळे होत आहेत. कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू या सारखे जीवाश्म इंधन जाळल्याने वायु प्रदूषण होत असून त्यामुळे 90 टक्के पेक्षा अधिक लोक अस्वस्थपणे श्वाच्छोश्वास घेत आहेत. वायू प्रदूषणामुळे ग्लुकोज नेट फुफ्फुसा शिवाय रक्तामध्ये जातात आणि त्यात ऑक्सीजन थिरियाडीकल्स तयार होतात. पुढे हे ऑक्सीजन थिरियाडीकल्स इतर अवयवाकडे जातात. पुर्वी असे मानले जात असे की, केवळ धुम्रपानामुळे फुफ्फुसाला विकार होतात. मात्र चिन व ऑस्ट्रेलीया यांच्या अभ्यासात असे समोर आले आहे की, पेट्रोल पंप, महामार्ग या लगत असलेल्या घरातील रुग्णास ह्रदय, फुफ्फुस विकार व कर्करोग हे तिन आजार जास्त प्रमाणात आढळून आले आहेत.

सध्या प्रामुख्याने जीवाश्म इंधन जाळल्याने टॉक्सीन तयार होत आहेत. हे टॉक्सिन शरीरातील तांबड्या पेशीपासून ते मेंदूच्या पेशीपर्यंत सर्वत्र काम करतात. शरीरातील तांबड्या पेशिंच्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होत आहे. त्याचा परिणाम ह्रदय व मेंदूवर होत आहे. पुर्वी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीस ह्रदयविकार अथवा कर्करोगाची अधिक शक्यता होती. मात्र सध्या निर्व्यसनी लोकांना ह्रदयविकार, कर्करोग होत असून त्याचे कारण वाढलेले प्रदूषण आहे. स्वाइन फ्लू, कोरोना या सारखे साथरोग उद्भवण्यातही अप्रत्यक्षपणे प्रदूषण कारणीभूत आहे.

प्रदूषणामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. पृथ्वीच्या तापमान वाढल्याने निसर्गाचा समतोल बिघडून पाण्याची पातळी कमी – जास्त होत आहे. यामुळे नवनविन विषाणूंचा संसर्ग होऊन्‍ साथरोग उद्भवत आहेत. प्रदूषणामुळे मनुष्याचे आयुर्मान कमी होत चालले आहे. वैद्यकीय विज्ञानाची आजची प्रगती पाहता आयुर्मान वाढून माणसे 90 वर्षापर्यंत जगणे अपेक्षीत आहेत मात्र यात प्रदूषण अडथळा निर्माण करीत आहे. मनुष्याच्या दैनंदिन गरजा व अस्वच्छता यामुळे प्रदूषण होते. त्यामुळे गरजा मर्यादित ठेवून आपण विज, वाहन यांचा वापर कमी करावा व वैयक्तीक स्वच्छता राखावी, असे डॉ. पाटील यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, कोरोना साथीच्या रोगात आपल्याला वैद्यकीय विज्ञानाची उपचार शक्ती दिसून आली. या काळात जगातीक पातळीवर वैद्यकीय सेवांमधील असमानता आणि कमतरता ठळकपणे जाणवल्या. शिवाय कोरोना महामारीने सर्व क्षेत्रातील उणीवाही उघड केल्या आहेत. यापुढे पर्यावरणाच्या मर्यादा न ओलांडता भविष्यातील आरोग्य संकटांना सामोरे जाण्यासाठी समान आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, ही काळाची गरज आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने पूर्वीपेक्षा अधिक रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पर्यावणाच्या बचावासाठी पुढे येवून चांगल्या बदलांची स्वत:पासून सुरुवात करावी.

यावेळी डॉ. राहुल किर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकूंद भिसे यांनी केले तर आभार डॉ. अनंत टाकळकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. दिपक तेलंगे डॉ. प्रमोद कुलकर्णी, प्रा. देवेंद्र तांदळे, डॉ. बळीराम सुर्यवंशी, डॉ. अफरिन खानम, सामाजिक कार्यकर्ता गणेश कराड, वरिष्ठ लिपीक रामराव कराड, सेवक बालाजी मुंडे, दिगांबर लोंढे यांनी पुढाकार घेतला.