फिट चा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो
फिट चा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. देवाशिष रुईकर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात अपस्मार दिन साजरा
‘फिट’ चा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो
मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. देवाशिष रुईकर
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात अपस्मार दिन साजरा
लातूर, दि. 14 – दौरे, फिट येणे, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. जगभरात फिटचे रुग्ण आढळून येत असून लोकसंख्येच्या एक टक्का एवढे या आजाराचे प्रमाण आहे. योग्य प्रमाणात औषधोपचार देऊन हा आजार बरा होऊ शकतो. औषधीच्या एका मात्रेत 50 टक्के रुग्णांचा आजार नियंत्रणात येतो. तर दुसऱ्या मात्रेत 15 टक्के रुग्णांना गुण येवून सामान्य जीवन जगता येते. तर उर्वरीत 35 टक्के रुग्णांना औषधींचा फायदा होण्याची शक्यता नसते. मात्र अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन अपस्मार आजार कायमचा दुरुस्त करता येतो, असे प्रतिपादन मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. देवाशिष रुईकर यांनी केले.
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसीन विभागाच्या वतीने सोमवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी आंतराष्ट्रीय अपस्मार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. देवाशिष रुईकर बोलत होते. या वेळी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक तथा महिला आरोग्य आणि कुटूंब कल्याण समन्वयक डॉ. वर्षा सौरभ कराड, विभाग प्रमुख डॉ. गजानन गोंधळी, डॉ. जे. के. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अपस्मार हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा विकार आहे. मेंदूची क्रिया असामान्य बनते तेंव्हा मेंदू मधील चेतातंतू मध्ये शॉर्ट सर्किट होते. त्यावेळी दौरा, असामान्य वर्तन तर काही रुग्णात स्तब्धता, जागरुकता कमी होते. मेंदूच्या कोणत्या भागात शॉर्ट सर्किट झाले. त्यावरुन अपस्मार चे निदान करता येते, असे सांगून या वेळी पुढे बोलताना डॉ. देवाशिष रुईकर म्हणाले की, अपस्मार हा आजार लहान वयात, वृध्दावस्थेत अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. डोक्यात ताप जाणे, पडणे, डोक्याला मार लागणे, रक्तातील साखर, मिठाचे प्रमाण कमी होणे या कारणामुळे सुध्दा फिट येते. अशी लक्षणे आढळून आल्यास तज्ज्ञांना दाखवून निदान करुन उपचार घ्यावेत. तर ह्रदयात धडधड, कमी रक्तदाब, तानतनाव या कारणामुळे सुध्दा काही रुग्ण चक्कर येवून पडतात. मात्र अशी लक्षणे फिटची नसतात.
या आजाराच्या प्राथमिक अवस्थेत तोंडाची हालचाल होणे, डोळा बंद होणे, गाल उडणे, चेहऱ्याची हालचाल होणे, हात पायाला मुंग्या येणे, हातपायाची हालचाल होणे, भास होणे अशी लक्षणे अढळून येतात. तर काही रुग्णात काणतेही लक्षण दिसून येत नाहीत. मात्र ते स्तब्ध राहतात. अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास रुग्णाने सुरक्षित ठिकाणी थांबावे. तसेच या आजाराच्या रुग्णांनी पोहणे, वाहन चालवणे टाळावे. फिट या आजारावर मागील काही वर्षात चांगले उपचार, औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे या आजारच्या रुग्णांनी जागरुक राहून तज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करुन न चुकता वेळेवर औषधे घ्यावीत, असे डॉ. रुईकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, अपस्मार या आजारात रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा रुग्णांची शुद्ध हरपते. अचानक खाली पडल्यामुळे शारीरिक इजा होते. या आजारावरील सर्व प्रकारचे उपचार यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असून अशा रुग्णांनी वेळ न दडवता येथील तज्ज्ञांना दाखवून उपचार घ्यावेत, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. वर्षा कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विपुल राका यांनी केले तर आभार डॉ. गजानन गोंधळी यांनी मानले. या प्रसंगी रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे, डॉ. अमर लिंबापूरे, डॉ. विशाल भालेराव, डॉ. आनंद दासरे, आहार तज्ज्ञ यशपाल कांबळे, सहाय्यक अधिसेवक मारुती हत्ते, मिना पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निवाशी डॉ. शेखर सोळंके, डॉ. हितेश मोरे, डॉ. व्यंकटेश याटकरला, डॉ. शुभम चौधरी, डॉ. सानिका नारकर, डॉ. जयश्री दहिफळे, लिपीक मिरा कुलकर्णी, सेवक सोमनाथ माळी यांनी पुढाकार घेतला. या वेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रुग्ण उपस्थित होते.