वैद्यकीय शिक्षणातून समाजोपयोगी डॉक्टर घडणार

डॉ. एन. पी. जमादार यांचा विश्वास; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी, पालक, शिक्षक मेळावा

वैद्यकीय शिक्षणातून समाजोपयोगी डॉक्टर घडणार

लातूर – केंद्र शासनाने पुर्वीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक चांगले बदल करुन 2019 पासून सक्षमता आधारीत वैद्यकीय शिक्षण अंगीकारले आहे. बदलत्या वैद्यकीय शिक्षणात वैद्यकीय शाखेतील सर्वांगांचा समावेश करुन विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण दिले जात आहे. या मुळे सध्याच्या शिक्षणातून जागतिक दर्जाचे व समाजोपयोगी डॉक्टर घडतील, असा विश्वास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी व्यक्त केला.

       येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवार, दि. 17 मार्च रोजी आयोजित एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाचे विद्यार्थी, पालक व शिक्षक मेळाव्यात डॉ. एन. पी. जमादार बोलत होते. या वेळी प्रशासकीय व शैक्षणिक संचालीका डॉ. सरिता मंत्री, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, सामाजिक औषध शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मुकूंद भिसे, शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. फिरोज पठाण, शरीरक्रिया शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, जीवरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन भावठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सध्या स्थितीतील वैद्यकीय शिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून मुलभूत विज्ञान, चिकित्साविषयक विज्ञानासह रुग्ण, नातेवाईकांशी कसा संवाद साधावा यांचे शिक्षण दिले जात असून हा जागतीक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण विकसीत होण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून या वेळी पुढे बोलताना डॉ. जमादार म्हणाले की, गुणांनुक्रमे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची दिशा निश्चित झाली असून विद्यार्थ्यांनी एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेताना ज्ञानाप्रमाणे कौशल्य अंगीकारुन स्वताला सिध्द करावे लागेत. नियमीत तासिका, प्रात्यक्षिक आणि वेळापत्रकानुसार रुग्णसेवेचे शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. वैद्यकीय शिक्षण पुर्ण करण्यासाठी अभ्यासाबरोबर आई – वडील व मित्रांची साथ महत्त्वाची असते. वैद्यकीय अभ्यासक्रमात नैतिकता, मुल्य यांना अनन्यसाधारण महत्त्व असून विद्यार्थ्यांनी शिस्तिचे पालन करुन शिक्षण घ्यावे, असे डॉ. जमादार म्हणाले.

एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयास गेल्या 30 वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेली असून सर्व शिक्षक अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार म्हणून कार्यरत असल्याचे डॉ. सरिता मंत्री यांनी सांगीतले. तर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या दृष्टीने नियमित तासिका, स्वयंअध्ययनाची सवय लावून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. नागोबा म्हणाले.

या वेळी प्रा. डॉ. महेश उगले यांनी शरीररचना शास्त्र अभ्यासक्रमा बाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. प्रा. डॉ. अजय गावकरे यांनी शरीरक्रिया शास्त्र या विषयी माहिती दिली तर प्रा. डॉ. सचिन भावठाणकर यांनी जीव रसायन शास्त्राबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गावकरे यांनी केले तर आभार डॉ. स्मिता बलसुरकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, जीवरसायन शास्त्र व सामाजिक औषध शास्त्र विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.