रुग्ण संख्येत झपाट्याने घट; मंगळवारी आढळले ५१ बाधित
लातूर: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने घटत असून मंगळवारी नवे ५१ बाधित रुग्ण आढळले तर १६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता बाधितांच्या आलेख ८९ हजार ६१७ वर पोहोचला आहे. तर यातील ८६ हजार ३८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर तसेच गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २ हजार २९७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी २९७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. तर १८३५ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून ५१ रुग्णांची भर पडली आहे. तर उपचारादरम्यान मंगळवारी पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत घट होत आहे. दररोज हजारावर रुग्णसंख्या गेली होती. मात्र आता दोन अंकी रुग्ण संख्या आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
मृत्यूच्या संख्येतही घट आहे. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ९६ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. तर १३ रुग्ण गंभीर मेकानिकल व्हेंटिलेटरवर आहेत. ५६ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १८३ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु ऑक्सिजनवर आहेत. तर १०६ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु विनाऑक्सिजनवर असून ५७५ रुग्ण सौम्य लक्षणाची उपचार घेत आहेत. ९३४ रुग्णांपैकी ५५८ दवाखान्यात तसेच कोविड केअर सेंटर मध्ये दाखल आहेत. तर ३७५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
१६० रुग्णांना मिळाली सुट्टी...
गृहविलगीकरणात तसेच कोविड सेंटर आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या १६० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. सदर रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गांधी चौक,एक हजार मुला-मुलींचे वस्तीगृह, शासकीय तंत्रनिकेतन आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.